टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:37+5:302021-06-16T04:50:37+5:30
मायणी : ‘युती शासनाच्या काळात घाईगडबडीने मायणी तलावात टंचाई काळातच टेंभू योजनेचे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात येईल, असा निर्णय ...

टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे
मायणी : ‘युती शासनाच्या काळात घाईगडबडीने मायणी तलावात टंचाई काळातच टेंभू योजनेचे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय चुकीचा असून, हे पाणी शेतीसाठी मिळावे, अशी आमची भावना आहे. त्यामुळे टेंभूचे पाणी शेतीसाठी मिळाल्याशिवाय स्वस्त बसावयाचे नाही, ही भूमिका यापुढील काळात आपणास घ्यावी लागेल,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
कलेढोण (ता. खटाव) गावातील खरातवस्तीमध्ये पाच लाख खर्चाच्या समाजमंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय व विकास विभागाचे सचिव शैलेंद्र वाघमारे, सरपंच सुहास शेटे, मिलिंद खरात, अविनाश खरात, राजू जुगदर, प्रकाश लिगाडे, मोहन तुपे, नंदकुमार खरात आदी उपस्थित होते.
गुदगे म्हणाले, ‘आपणापुढे असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी राजकारण गरजेचे असले तरी राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे. या विभागात आत्तापर्यंत बंधारे, रस्ते, वॉटर सप्लाय, समाजमंदिरे आदी कोट्यवधींची कामे आपण केली असून, यापुढील कालावधीतही लोकांच्या गरजेनुसार काम करण्याचा आपण प्रयत्नशील आहे.’
येथील कुटीर रुग्णालयास सर्व सुविधांसाठी पन्नास लाखांची तरतूद केली आहे. या हॉस्पिटलच्या कामाने गती घेतली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा राहणार असून, या ऑक्सिजन प्लांटद्वारे तालुक्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य होणार आहे.
१४मायणी
कलेढोण येथील खरातवस्ती येथे समाजमंदिराचे भूमिपूजन करताना सुरेंद्र गुदगे, शेजारी सुहास शेटे, शैलेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)