१.५४ लाख लोकांना ६८ टँकरने पाणीपुरवठा
By Admin | Updated: August 18, 2014 23:35 IST2014-08-18T22:23:22+5:302014-08-18T23:35:14+5:30
कऱ्हाड, पाटणला सुकाळ : माण, खटावला दुष्काळ

१.५४ लाख लोकांना ६८ टँकरने पाणीपुरवठा
सातारा : जिल्ह्याच्या डोंगरी भागात संततधार पावसाने शेतकरी सुखावला असला दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांत मात्र भयावह परिस्थिती आहे. दरम्यान, दुष्काळी भागाबरोबरच काही सधन तालुक्यांतही टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, येथेही पावसाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांपूर्वी जावळी, पाटण आणि कऱ्हाड या तीन तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, जोरदार पावसामुळे टँकर पुरवठा बंद झाला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असले तरी काही ठिकाणी अजूनही शासन यंत्रणा पोहोचली नसल्याची परिस्थिती आहे. धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होत असला तरी तो अजूनही पुरेसा नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात आजमितीस ६४ टँकरने ३२९ गावे आणि वाडी-वस्तींवर पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ८५ गावे आणि २४४ वाड्यांचा समावेश असून, तहानलेल्या लोकांची संख्या १ लाख ५४ हजार ८९ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
खटाव तालुक्यात २२ टँकरने ३५ गावांतील ४८ हजार ८०१ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ६ टँकरने १९ गावांतील ३८ हजार ४१२ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
फलटण तालुक्यात १० टँकरने १० गावे व ७२ वाड्यांतील २० हजार ४४८ लोकांना तर वाई तालुक्यात २ टँकरने २ गावांतील ४ हजार ८८९ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
भयावह परिस्थिती
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत काही भागांत भयावह परिस्थिती आहे. माण आणि खटाव तालुक्यांत पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार माण तालुक्यात १९ गावे व १७० वाड्यांतील ४१ हजार ५७९ लोकांना २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.