हिवरेच्या माळावर जलसंधारण, वृक्षलागवडीचे काम
By Admin | Updated: July 8, 2015 22:02 IST2015-07-08T22:02:48+5:302015-07-08T22:02:48+5:30
लोकसहभाग महत्त्वाचा : मदन भोसले यांच्याकडून कामाचे कौतुक

हिवरेच्या माळावर जलसंधारण, वृक्षलागवडीचे काम
कोरेगाव : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या विधायक नेतृत्वातून कारखाना कार्यस्थळावर उभ्या राहिलेल्या जलसंधारण आणि वृक्षलागवडीच्या कामातून प्रेरणा घेऊन हिवरे, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहभागातून माळरानावर जलसंधारण आणि वृक्षलागवडीचे मोठे काम उभे केले आहे. दरम्यान, लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या कामांची पाहणी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले व संचालक मंडळाने करून हिवरे ग्रामस्थांच्या या विधायक कार्याचे कौतुक केले.
हिवरे हे कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर भागातील जेमतेम तेराशे लोकवस्तीचं गाव. तिन्ही बाजूंनी छोट्या-मोठ्या डोंगरांनी वेढलेल्या या गावातील ग्रामस्थांनी डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे. एकात्मिक पाणलोट विकास, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ओढाजोड, तेरावा वित्त आयोग, ग्रामपंचायत स्वनिधी आणि लोकसहभागातून तीस हेक्टर वनखात्याच्या जमिनीवर अनेक लहान-मोठे, कच्चे-पक्के, सिमेंट बंधारे बांधून डोंगर उतारावरून वाहून येणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचा आणि जमिनीत जिरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अजित खताळ, उपसरपंच समाधान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी जलसंधारणाबरोबरच गावमालकीच्या सुमारे ३३ एकर मुरमाड-खडकाळ गायरान जमिनीवर सुमारे साडेपाच हजार सीताफळांची झाडे लावून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे एक नवे साधन निर्माण करून दिले आहे. त्याबरोबरच वृक्षलागवड व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्याअंतर्गत वनखात्याच्या जमिनीवर करंज, आवळा, कडुलिंब अशा विविध जातींच्या वृक्षांचे रोपण करताना ही झाडे शंभर टक्के जगविण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे, गायरान जमिनीवर साडेपाच हजार सीताफळांच्या झाडांना ठिबकने पाणी देण्याची व्यवस्था करून जलबचतीचा संदेशही दिलेला आहे.
कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, केतन भोसले, अॅड. धनंजय चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘रानमेवा उद्याने’ उभारा...
लोकसहभागातून अशा प्रकारचे उल्लेखनीय काम उभे राहिलेले पाहून मदन भोसलेंसह सर्वच मान्यवर प्रभावित झाले. हिवरे ग्रामस्थांनी भविष्यात ‘रानमेवा उद्यान’ व ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ उभारावा, किसन वीर साखर कारखाना परिवाराचे हिवरे ग्रामस्थांना लोकोपयोगी सार्वजनिक कामासाठी सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही देऊन मदन भोसले यांनी ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले.