वारकरी महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-29T00:21:17+5:302014-06-29T00:28:50+5:30
काळजजवळ अपघात : पंढरीची वारी पुरी नाही झाली !

वारकरी महिलेचा मृत्यू
तरडगाव : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरी महिलेचा अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मृत्यू झाला. हा अपघात आज, शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. त्रिवेणा सतोबा डांगे (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. माळकिणी (जि. यवतमाळ) येथील उत्तम बापू धारमोहेकर या दिंडीतून त्या पंढरपूरला जात होत्या.
आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केलेल्या माळकिणी येथील उत्तमबापू धारमोहेकर या दिंडीतील वारकरी लोणंद-फलटण रस्त्याच्या एका बाजूला विसाव्यासाठी थांबले होते. त्यातील काही महिला सकाळीच न्याहरीसाठी स्वयंपाक करत होत्या. यावेळी या दिंडीतीलच त्रिवेणा डांगे या नैसर्गिक विधीसाठी उसाच्या शेतात जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. याचवेळी लोणंदकडून फलटणकडे निघालेल्या एका पांढऱ्या रंगाच्या जीपने ठोकरले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्रिवेणा डांगे यांचे बंधू देवराव नारायण दुपारते (रा. माळकिणी) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली. पोलीस उपअधीक्षक राहुल माकणीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन वारकऱ्यांची विचारपूस केली. हवालदार यशवंत महामुलकर, सतीश शिंदे, हेमंत निकम तपास करत आहेत. (वार्ताहर)