विचारांची ज्योत तेवत राहायला हवी- हौतात्म्याला एक वर्ष...
By Admin | Updated: August 18, 2014 23:39 IST2014-08-18T22:37:32+5:302014-08-18T23:39:37+5:30
धार्मिक क्षेत्रातील प्रतिक्रिया

विचारांची ज्योत तेवत राहायला हवी- हौतात्म्याला एक वर्ष...
राजीव मुळ्ये - सातारा --उपासनेला, धर्माला, श्रद्धेला कधीही विरोध न करता, त्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांचा विचारांच्या माध्यमातून समाचार घेणारे, विवेकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांना विचारांनी उत्तर देणे नाकारून त्यांची हत्या होणं धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनाही खटकलंय. डॉक्टरांनी देवा-धर्माला कधीच विरोध केला नाही. मात्र समाजवादी विचार, आर्थिक आणि सामाजिक समता हे उद्दिष्ट मानून सुधारकांचे विचार कृतीत आणले, हे सर्वांनी पाहिलंय. त्यामुळं त्यांच्या विचारांची ज्योत तेवत राहावी, असं धार्मिक क्षेत्रातही मानलं जातं.
चुकीच्या कल्पना, चुकीच्या रूढी आणि चुकीच्या विचारांना डॉक्टरांनी आजन्म विरोध केला. आपल्या सुखदु:खाचा विचार न करता आयुष्यभर विचारक्रांतीला वाहून घेतलं. लोकांना चुकीच्या वाटेने जाताना पाहून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला या कामात आयुष्यही गमवावं लागलं, याची खंत इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीही बोलून दाखवितात.
धार्मिक क्षेत्रातील प्रतिक्रिया
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक डॉक्टरांच्या बलिदानानंतर तरी अनेक लोकांना दिसू लागला आहे. जादूटोणा करणाऱ्यांमुळे खऱ्या श्रद्धाळूंच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अंधश्रद्धा कमी झाल्याच पाहिजेत, असे माझे मत आहे. डॉक्टरांच्या बलिदानामुळे लोक या विषयाकडे डोळसपणे पाहू लागतील आणि हळूहळू खऱ्या श्रद्धाच शिल्लक राहतील.
- ओंकार बोडस, पुरोहित
ज्यांनी संपूर्ण आयुष्य चुकीच्या कल्पना, रूढींना विरोध करण्यासाठी वेचले, त्यांना याकामी आयुष्य गमवावं लागलं, याची खंत उभ्या महाराष्ट्राला आहे. त्यांचा पूजेला नव्हे, अघोरी प्रकारांना विरोध होता. विचाराला हिंसेने उत्तर देऊन चालत नाही. येणाऱ्या दिवसांत त्यांचे बुद्धिवादी विचार, जे सावरकर-आगरकरांनीही मांडले, त्याची अंमलबजावणी पुरोगामी महाराष्ट्रात व्हायला हवी.
- रमणलाल शहा, ज्योतिषतज्ज्ञ
माणूस गरज म्हणून अंधश्रद्धेकडे वळतो. त्याचं मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. गरजवंताचा गैरफायदा घेऊन काही जण शास्त्रोक्त काम न करता पैसे उकळण्याचं काम करतात. त्यातून एखाद्याला लाभ झाला तर तो संबंधिताचा उदोउदो करतो आणि गैरप्रकार वाढत जातात. वैचारिक मतभेद असतील, तर ते चर्चेने सुटू शकतात; मात्र त्यासाठी हिंसेचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत निषेधार्हच!
- प्रसाद चाफेकर, वास्तुशास्त्रतज्ज्ञ
माणसाच्या वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी धर्माची निर्मिती झाली. माणसावर कायद्यापेक्षाही अधिक धाक धर्माचा असू शकतो; मात्र काही लोकांनी धर्मात नंतर अनावश्यक बाबी आणल्या. अशा बाबी डॉ. दाभोलकरांनी उघड केल्या. त्यांची हत्या होण्याने महाराष्ट्राचे नुकसान झाले असून, मारेकरी न सापडणे हे प्रशासनाचे अपयश होय.
- तुषार पाटील, विश्वस्त, भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, करंजे