शंभर वर्षाचं आयुष्य हवंय तर योगा करा..

By Admin | Updated: June 23, 2016 01:41 IST2016-06-22T23:46:16+5:302016-06-23T01:41:29+5:30

देऊर : १०७ वर्षीय ज्येष्ठाने उलगडले निरोगी जीवनाचे रहस्य; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

Want a hundred years of life then do yoga .. | शंभर वर्षाचं आयुष्य हवंय तर योगा करा..

शंभर वर्षाचं आयुष्य हवंय तर योगा करा..

वाठार स्टेशन : ‘मी आयुष्यभर दुसऱ्याच्या घरात चाकरी केली, याचा फायदा माझ्या शतकोत्तर आयुष्यात झाला. आज पैसा मिळवणं खूप साधं सोपं आहे; पण शंभर वर्षे आयुष्य मिळवणं दुर्मीळ आहे. अशा आयुष्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतला पाहिजे; तरच आपल्याला आयुष्याची शंभरी गाठता येइल,’ असा विश्वास देऊर मधील १०७ वर्षीय धोंडिराम जाधव यांनी व्यक्त केला.
जागतिक योग दिनानिमित्त देऊर येथील मुधाई मंगल कार्यालयात पतंजली योग समितीच्या वतीने वृक्षारोपण व गावातील सर्वात ज्येष्ठ धोंडिराम जाधव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी योग प्रक्षिक्षक विजय टंकसाळे,
मोहन शिंदे, सुरेश निंबाळकर, प्राचार्य विजय राजे, मधुकर कदम, राजेंद्र
शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
‘पतंजली’चे प्रशिक्षक विजय टंकसाळे म्हणाले, ‘आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसांचं आयुष्य कमी झाले आहे. यामागे समाजातील विविध घटक जबाबदार आहेत; परंतु आपलं आयुष्य निरोगी आणि निरामय राहण्यासाठी योगसाधना हाच खात्रीशीर इलाज आहे. गेली वर्षभर या ठिकाणी मोफत योगावर्ग भरवून अनेकांचे आजार नाहीसे करण्यात यश आल्याचे समाधान व्यक्त करत केवळ एक दिवसाचा उपक्रम म्हणून योगा न करता हा वर्ग कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.’
सुरेश निंबाळकर म्हणाले, ‘आज अमेरिकेसारख्या प्रगत देशातील तीन कोटी लोक दररोज योगा करतात. जगातील अनेक देशांमध्ये योगाला स्थान आहे. यामुळे योगा आज जीवनाची गरज बनला आहे.’ यावेळी विजय राजे, विठ्ठल कदम, जालिंदर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Want a hundred years of life then do yoga ..