जलयुक्त विसापूरची ठिबकयुक्तकडे वाटचाल

By Admin | Updated: July 29, 2016 23:27 IST2016-07-29T22:48:21+5:302016-07-29T23:27:05+5:30

खोरेमुक्तीसाठी प्रयत्न : शिवारात जागोजागी पाण्याचे साठे!

Wandering to the water trough drip of Visapur | जलयुक्त विसापूरची ठिबकयुक्तकडे वाटचाल

जलयुक्त विसापूरची ठिबकयुक्तकडे वाटचाल

सातारा : टंचाईग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरकरांनी लोकसहभागाची ताकद काय असते, ते शासनाचे जलयुक्त शिवार अभियान राबवून दाखवून दिले आहे. मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग, श्रमदान व शासनाच्या मदतीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे संघटितपणे केल्याने आज विसापूरच्या शिवारात जागोजागी पाण्याचे साठे पाहायला मिळत आहेत. जलयुक्त बनलेल्या विसापूरची ठिबकयुक्त आणि खोरेमुक्तीकडे जाणारी वाटचाल निश्चितच प्रेरणादायी बनेल.
डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरची लोकसंख्या अवघी ५ हजार. गावचे पर्जन्यमान सरासी ६५० ते ७०० मि.मी. गावामध्ये ५७६ हेक्टर बागायत क्षेत्र, ६५० जिरायत क्षेत्र तर पडीक क्षेत्र व डोंगरमाथा ते पायथा ४१७.८७ हेक्टर असे एकूण १६४४.६७ हेक्टर भौगोलिक क्षेत्र. गावामध्ये असणारे राम ओढ्याचे तसेच गाव ओढ्याचे लोक वर्गणीतून रुंदीकरण व खोलीकरण केले. या ओढ्यांवर १६ वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून २.२५ कोटी लिटर पाणी अडविले गेले आहे. लोकवर्गणी, कृषी विभाग, यांत्रिकी विभाग यांच्या मदतीने माथा ते पायथा या संकल्पनेनुसार गावामध्ये ४५० हेक्टर डीपसीसीटी काम पूर्ण केलेले आहे.
इजाळीमधून ७ हजार ४४० क्युबीक मीटर, वाणदरामधून ९९२० क्युबीक मीटर, आवारवाडीमधून ८०८० क्युबीक मीटर तर कोकाटेमधून ३२०० क्युबीक मीटर अशा चार पाझर तलावांमधून एकूण २८ हजार ६४० क्युबीक मीटर गाळ लोकसहभाग व यांत्रिकी विभाग आलोरे यांच्या मदतीने काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकून शेत जमीनही वहिवाटीत आणली आहे. लोकवर्गणीतून ६ माती नालाबांधमधून गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविली आहे. लोकवर्गणीतून ५ सिमेंट बंधाऱ्यांतील गाळ काढला आहे. रोजगार हमी योजनेतून ५ विहिरींचे व २ विंधन विहिरींचे पुनर्भरण केले आहे. टंचाईमुक्तीचा शिक्का विसापूरकरांनी आपल्या कामातून पुसून टाकला आहे. जलयुक्तकडून ठिबकयुक्तकडे आणि खोरेमुक्तीकडे विसापूरची वाटचाल ही अन्य गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. (प्रतिनिधी)


गाव ठिबकयुक्त करणार
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या प्ररणेने जनजगृती करून लोकसहभागातून १६ वनराई बंधारे बांधून सुमारे अडीच कोटी लिटर पाणीसाठा निर्माण केला आहे. अवघ्या दीड महिन्यात ४५० हेक्टर सीसीटीचे काम पूर्ण केले. यामध्ये यांत्रिकी विभागामार्फत १०० ते ११० हेक्टर आणि उर्वरित लोकसहभागातून करण्यात आलेले आहे. सध्या गावामध्ये कृषी विभाग आणि स्थानिकस्तर यांच्या माध्यमातून १४ सिमेंट बंधारे उपलब्ध झाले आहेत. गावामध्ये निर्माण झालेला पाणीसाठा काटकसरीने वापरण्यासाठी गाव ठिबकयुक्त आणि खोरेमुक्त करत आहोत. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असल्याची भावना सरपंच सागर साळुंखे यांनी बोलून दाखविली.

Web Title: Wandering to the water trough drip of Visapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.