खिशात ‘पास’ तरीही ‘वडाप’ने प्रवास !

By Admin | Updated: July 29, 2016 23:25 IST2016-07-29T22:31:17+5:302016-07-29T23:25:05+5:30

कऱ्हाड आगार : १०५ गाड्यांवर १७ हजार विद्यार्थ्यांचा भार; अपुऱ्या गाड्यांच्या संख्येमुळे वडापने प्रवास--असून पास.. ..एसटीत नापास

'Wandap' travels with 'pass' in the pocket | खिशात ‘पास’ तरीही ‘वडाप’ने प्रवास !

खिशात ‘पास’ तरीही ‘वडाप’ने प्रवास !

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थी सवलत पास दिला जातो. यंदा महाविद्यालयात जाऊन पास दिले. परंतु, एसटीत जागाच नाही म्हणून खंडाळा तालुक्यातील काही मुलांना गेल्या आठवड्यात शाळा बुडवावी लागली होती. या पार्श्वभूमीवर आगारनिहाय
घेतलेला आढावा..



कऱ्हाड : शालेय व महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी खर्चात प्रवास करण्यासाठी महिन्याकाठी एसटी पासची सुविधा राज्य परिवहन विभागामार्फत देण्यात आली आहे.
सध्या शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश निश्चित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना एसटी आगारातून पासही देण्यात आले आहेत. मात्र, १६ हजार ५०० एवढ्यांच्या नियमित प्रवासाच्या सेवेसाठी फक्त १०५ एवढ्याच एसटी बसेस कऱ्हाड आगारात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खिशात पास अन् वडापने प्रवास करावा लागत आहे.
कऱ्हाड तालुक्यातील २२२ गावांतून १६ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दररोज कऱ्हाडला येतात. या विद्यार्थ्यांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नवाढीमध्ये मोठी भर पडते. विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मासिक पासमध्ये सवलतही दिली जाते. ती म्हणजे महिन्याला वीस दिवसांचे प्रवासी शुल्क आकारून तीस दिवसांचा प्रवास घडविला जातो. तालुक्यातील सध्या २८ शाळांतील १ हजार ११५ एवढ्या मुली या मोफत पास योजनेचा लाभ घेत आहेत.
गाड्यांचे चुकीचे वेळापत्रक, गाड्यांची असलेली स्थिती, तसेच वाहक, चालकांकडून होत असलेला त्रास अशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आज एसटी महामंडळाच्या गाड्यांतून प्रवास करण्याचा विश्वास कमी होत चालला आहे. महिन्याकाठी साठ रुपयांपासून ते सातशे रुपयांपर्यंत पास काढूनही विद्यार्थ्यांना उशिरा प्रवास केल्यामुळे शैक्षणिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे पास काढूनही विद्यार्थ्यांना कधीकधी खासगी वडाप वाहनांनी प्रवास करावा लागतो.
महिन्याकाठी कसाबसा पास काढूनही वेळेवर एसटी येत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते. पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे शाळेची व कॉलेजची फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना बोनाफाईड दिले जात नाही. तर दिल्यास ते घेऊन एसटी आगारातील संबंधित पास वितरण विभागप्रमुखांकडे आणून दिल्यानंतर विद्यार्थ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाचा फॉर्म भरून घेतला जातो. तो घेतल्यानंतर विद्यार्थ्यांकडून मासिक पासचे शुल्क आकारले जाते व त्यास बसचा पास व ओळखपत्र दिले जाते. हे सर्व करूनही एसटी चालक बसथांब्यांवर बस थांबवत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागते.
विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी कऱ्हाड आगारातून कॉलेज मार्गावर दररोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत १६२ फेऱ्या जरी गाड्यांच्या सुरू केल्या असल्यातरी त्या विद्यार्थ्यांसाठी कमीच पडत आहेत. अशात गर्दीमुळे एसटीची चालकांकडून बस न थांबविली गेल्यामुळे आज पास काढूनही खासगी वडापने प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. (प्रतिनिधी)

एसटीच्या सांगाड्यातून प्रवास
महिन्याकाठी पैसे देऊन पास काढूनही मोडक्या एसटी गाडीतून प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात तर एसटीचे ठिकठिकाणी छतही गळके असल्याने उभे कुठे राहायचे आणि बसायचे कुठे असा प्रश्न विद्यार्थी आणि प्रवाशांना पडत असतो. तर मोडकळलेल्या बाकड्यांवर बसून दररोजचा प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

15000 विद्यार्थ्यांना 52 गाड्या

पाटण : एसटीच्या विद्यार्थी सवलत पासचा पाटण तालुक्यातील सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मात्र, पाटण आगारात केवळ ५२ गाड्या असून, त्यापैकी नऊ गाड्या मिनीबस आहेत. त्यामुळे इतर मार्गावरील फेऱ्यांचे नियोजन सांभाळून विद्यार्थी वाहतूक करताना पाटण आगाराचे वेळापत्रक कोलमडत आहे. शाळेतून घरी जाताना विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत विजय पवार यांनी विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल विषय उपस्थित केला होता. पाटण तालुक्यात चाफळ, कोयना, तारळे, पाटण येथील एसटीच्या नियंत्रण कक्षेतून पास देण्याची व्यवस्था केली होती.
आगारातील एक कर्मचारी बाळासाहेब देसाई कॉलेज, माने-देशमुख विद्यालय व देसाई कारखानास्थळावरील पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी जाऊन विद्यार्थी पासचे वितरण केले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गाड्या वाढविण्याची मागणी होत आहे.


पाटण आगारात १०२ वाहक आणि १०७ चालक आहेत. विद्यार्थी वाहतुकीबाबत फार काळजी घेतात. प्रत्येक विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचावा हीच त्यांची भूमिका असते. मात्र, गाड्या व कर्मचारी संख्या कमी आहे.
- विजय गायकवाड, आगार प्रमुख, पाटण

Web Title: 'Wandap' travels with 'pass' in the pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.