घारेवाडीच्या धुळोबा डोंगरावर वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:45+5:302021-04-01T04:39:45+5:30
घारेवाडी येथे धुळोबा डोंगर परिसर हिरवागार करण्यासाठी कऱ्हाडमधील शिवराय ट्रेकिंग ग्रुप, सह्याद्री प्रतिष्ठान, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने मोठे परिश्रम घेतले. ...

घारेवाडीच्या धुळोबा डोंगरावर वणवा
घारेवाडी येथे धुळोबा डोंगर परिसर हिरवागार करण्यासाठी कऱ्हाडमधील शिवराय ट्रेकिंग ग्रुप, सह्याद्री प्रतिष्ठान, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने मोठे परिश्रम घेतले. त्याचबरोबर मध्यंतरी तेथील शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे. मंदिराच्या जीर्णाेद्धारात अनेकांनी हातभार लावला असून, जीर्णाेद्धारामुळे या परिसराचे रूपडे पालटले आहे. त्याबरोबरच मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आल्यामुळे या परिसराला वैभव प्राप्त झाले होते. वृक्षारोपणामुळे भविष्यात हा परिसर हिरवागार होणार होता. या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठीही प्रयत्न केले जात होते. वृक्षांना नियमितपणे पाणी मिळावे, यासाठी गत महिन्यात सह्याद्री प्रतिष्ठान आणि सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठिबक सिंचन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने या डोंगराला वणवा लागला. हा वणवा मंदिर परिसरामध्ये पसरल्याने अनेक रोपे व वृक्ष जळून खाक झाले. ठिबक सिंचनालाही त्याचा मोठा फटका बसला. ठिबकच्या पाईपसह इतर यंत्रणा जळून खाक झाली.
या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ज्यांनी ही आग लावली, त्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी शिवराय ट्रेकिंग ग्रुप व सह्याद्री प्रतिष्ठानने केली आहे.
फोटो : ३१केआरडी०१
कॅप्शन : घारेवाडी, ता. कऱ्हाड येथील धुळोबा डोंगराला लागलेल्या वणव्यात शेकडो झाडे जळून खाक झाली.