सातारा : फलटणच्या भिंती बनल्या स्वच्छतादूत, रातोरात बदलले रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:53 IST2018-02-21T13:48:12+5:302018-02-21T13:53:27+5:30
ऐतिहासिक फलटणनगरी तशी पाहताक्षणी डोळ्यात भरणारी. फलटण शहर हे ऐतिहासिक वास्तू व मंदिरांनी बनले आहे. अशा या सुंदर नगरीचे रूप रातोरात बदलतेय ते सध्या सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत. कारण येथील घरांच्या भिंती रंगांनी सजवून त्यावर स्वच्छतेचा संदेश लिहिण्यात आला आहे.

सातारा : फलटणच्या भिंती बनल्या स्वच्छतादूत, रातोरात बदलले रूप
फलटण: ऐतिहासिक फलटणनगरी तशी पाहताक्षणी डोळ्यात भरणारी. फलटण शहर हे ऐतिहासिक वास्तू व मंदिरांनी बनले आहे. अशा या सुंदर नगरीचे रूप रातोरात बदलतेय ते सध्या सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत. कारण येथील घरांच्या भिंती रंगांनी सजवून त्यावर स्वच्छतेचा संदेश लिहिण्यात आला आहे.
फलटणच्या नागरिकांना गेली अनेक वर्षे स्वच्छतेची सवय अंगवळणी पडलेली आहे. येथील घंटा गाडीने दशकपूर्ती केव्हाच केली आहे. पूर्वी सुंदर व स्वच्छ असणाऱ्या फलटणचे रूप स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने रात्री-दोन रात्रीत बदलताना नागरिकांना अनुभवयास मिळाले आहे.
फलटणचा बसस्थानक परिसर मुधोजी हायस्कूल, शासकीय विश्रामगृह, माळजाई मंदिर परिसर, खजिना हौद, नगरपालिका, मलटणमधील बाह्य रस्ते, महादेव मंदिर या सर्व ठिकाणांचा कायापालट झालेला दिसत आहे.
पूर्वी याच इमारतीच्या भिंती काही समाजकंटकांनी विद्रूप करून टाकल्या होत्या. अनेक ठिकाणच्या भिंती मळक्या झाल्या होत्या. काही ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साठले होते. सुंदर फलटणच्या सौंदर्यात या गोष्टी बाधा आणत होत्या; पण नगरपालिका कर्मचारी आणि नागरिकांनी रातोरात ही सर्व ठिकाणे स्वच्छ केली आणि रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या भिंतींनाच स्वच्छतादूत बनविले.
रंगात स्वच्छता व सामाजिक संदेशांनी या सर्व भिंती बोलू लागल्या आहेत. या भिंतीवरचे स्वच्छता संदेश नागरिकांच्या हृदयापर्यंत पोहोचत आहेत.