जिल्ह्यातील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मच बनलाय स्थानकांसाठी वॉकिंग ट्रॅक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:00+5:302021-08-26T04:42:00+5:30
सातारा : रेल्वे सेवा सर्वाधिक शिस्तीची असल्याचे सांगितले जाते. मात्र ग्रामीण भागात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्थानिक नागरिकांशी दररोजचा संबंध असतो. ...

जिल्ह्यातील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मच बनलाय स्थानकांसाठी वॉकिंग ट्रॅक!
सातारा : रेल्वे सेवा सर्वाधिक शिस्तीची असल्याचे सांगितले जाते. मात्र ग्रामीण भागात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्थानिक नागरिकांशी दररोजचा संबंध असतो. त्यामुळे कोणीही स्थानकात आल्यावर प्लॅटफार्म तिकीट काढण्याच्या भानगडीत पडत नाही. अनेक ठिकाणी तर सायंकाळी फिरायला, शतपावली करायला लोक जात असल्याचं गमतीनं सांगितले जातं. सातारा जिल्ह्यात दळणवळणाचे जाळे घट्ट विणले आहे. त्यातील रेल्वे ही एक सर्वांत महत्त्वाची यंत्रणा आहे.
ब्रिटिशांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळे ती आजही यशस्वीपणे चालली आहे. हे खरे आहे. रेल्वेतून कोणीही फुकट प्रवास करू नये म्हणून ठिकठिकाणी तिकीट तपासणी अधिकारी असतात. त्याचप्रमाणे बाहेरून प्रवास करून आला तर प्रवास तिकीट असते. मात्र, स्थानिकांनीही विनाकारण इकडे फिरकू नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट काढणे सक्तीचे असते. त्याचा अवधी काही तासांसाठी असतो. मात्र, सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानकांत स्थानिक मंडळी तिकीट न काढताच पाहुण्यांना नेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जातात. तर काही जण सायंकाळी निवांत फिरायला किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी रेल्वे फ्लॅटफॉर्मवर जातात. त्यांच्यासाठी हा जणू वाॅकिंग ट्रॅकच बनला आहे.
चौकट
रेल्वेचे मोठे नुकसान
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रेल्वे स्थानक सोडले तरी सातारा, कऱ्हाड, लोणंद येथे जंक्शन आहे. या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. दररोज हजारो प्रवासी येतात. मात्र प्लॅटफॉर्म तिकीट काढले जात नसल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.
चौकट
वाहनतळाचा वापरच नाही!
सातारा रेल्वे स्थानक शहरापासून दूर आहे. त्यामुळे वाहनांनी जाण्याशिवाय पर्यायच नसतो. तेथे पे अँड पार्क वाहनतळ आहे. मात्र, वाहनतळाचा कोणीही वापर करीत नाही. इतरत्र गाड्या उभ्या केल्या जातात. दोन-तीन दिवसांसाठी गावी जायचे असेल तरच वाहनतळाचा वापर केला जातो.
कोट
रेल्वे स्थानकात प्लटफॉर्म तिकिटातून चांगला महसूल मिळत असतो. काही जण प्रामाणिकपणे काढतातही. मात्र अनेक जण आम्ही येथील असल्याचे सांगतात. काही जण वाद घालतात. त्यामुळे कर्मचारीही दुर्लक्ष करतात.
- एक कर्मचारी
कोट
तिकीट तपासायला येतोय कोण?
सातारा जिल्ह्यातील कोणत्याही रेल्वे स्थानकात गेले तरी तिकीट तपासणी अधिकारी भेटतच नाहीत. एक-दोनदा तिकीटही काढले; पण कोण विचारत नाहीत म्हटल्यावर त्यानंतर कोणी तिकीट काढत नाहीत.
- जनार्दन पाटील, प्रवासी सातारा
कोट
साताऱ्यातील रेल्वे स्थानक अडगळीत आहे. येथे चोरट्यांचा धुमाकूळ जास्त असतो. त्यामुळे आम्ही पुण्याला जाताना पेे अँड पार्कला गाडी उभी करूनच जात असतो. त्यामुळे प्रवासात चिंता उरत नाही.
- विकास धुमाळ, सातारा.
असे वाढले दर
लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने फक्त मोठ्या रेल्वे स्टेशनवर प्लेटफॉर्म तिकीट ५० रुपये केले होते. मात्र जुलैपासून यामध्ये १० रुपये कमी करून ४० रु. करण्यात आले होते. मात्र छोट्या रेल्वे स्टेशनवर हे तिकीट १० रुपये असून हे तिकीट फारसे कोणी घेताना दिसून येत नाही.