"कृष्णा" च्या सभासदांना मतदार यादी प्रसिद्धीची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:56+5:302021-03-23T04:41:56+5:30
कराड : सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मे महिन्यात होण्याची ...

"कृष्णा" च्या सभासदांना मतदार यादी प्रसिद्धीची प्रतीक्षा!
कराड : सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील वातावरण चांगलेच तापले असून, संभाव्य तिन्ही पॅनलचे नेते गावोगावी सभासद बैठका घेत आहेत, तर सभासदांना मात्र आता मतदार यादी प्रसिद्धीची प्रतीक्षा लागली आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चाळीस हजारांवर सभासद आहेत. दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली सन १९८९ साली कारखान्यात पहिले ऐतिहासिक सत्तांतर घडले. त्यानंतर त्यांनी खुले सभासदत्व ही संकल्पना राबवली. त्यामुळे कृष्णा कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणावर वाढले. त्यानंतर प्रत्येक वेळी सत्तांतर झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतले सभासद वाढवून निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला.
आतासुद्धा सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांनी काही हजार सभासद वाढवल्याची चर्चा आहे. पण ती सभासद वाढ चुकीची आहे. जमीन नावावर नसलेल्या व्यक्तिंनाही सभासदत्व बहाल केल्याची तक्रार संस्थापक पॅनलच्या अविनाश मोहितेंकडून साखर संघ व कराड तालुका पोलिसातही करण्यात आली आहे. त्यामुळे सभासद यादीत नक्की किती सभासद मतदार असणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे पाच वर्षांचा कार्यकाल संपूनही कृष्णा कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढीची लॉटरी लागली. मात्र, ही निवडणूक लवकर घ्यावी, अशी मागणी सभासद डॉ. अजित देसाई यांनी न्यायालयात केली होती. यावर न्यायालयाने संबंधितांना तसे निर्देश दिल्याने सध्या निवडणूकपूर्व तयारी सुरू झाली आहे.
या आठवड्यात सभासद मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध होईल. त्यावरच्या हरकतींचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक प्रक्रिया जाहीर होईल, असे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे सध्या सभासदांच्यात मतदार यादी प्रसिद्धीची प्रतीक्षा दिसत आहे.
चौकट
...ते सभासद पाच वर्षे लटकले
यशवंतराव मोहिते यांनी खुले सभासदत्व देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. १३ हजार ५२८ शेतकऱ्यांना सभासद केले. मात्र, त्यावर भोसले गटाने आक्षेप घेतल्याने निवडणुकीत या सभासदांनी मतदान केले खरे, पण; ते मतदान वेगळ्या पेटीत ठेवून दिले होते, ते मोजलेच गेले नाही. परिणामी मोहिते गटाची सत्ता आल्यानंतर पुनर्प्रक्रिया करून संबंधितांना सभासद करून घेण्यात आले होते.
चौकट
अनेकांचे शेअर्स ट्रान्सफर प्रलंबित
मयत झालेल्या सभासदांच्या वारसदारांना सभासद करून घेण्याची पद्धत आहे. त्यासाठी अनेक वारसांनी कागदपत्रांची पूर्तताही केली आहे. मात्र, आपले नाव मतदार यादीत आले आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनाही मतदार यादी प्रसिद्धीची प्रतीक्षा लागली आहे.
चौकट:
क्रियाशील की अक्रियाशील...
ज्यांनी गत पाच वर्षात किमान तीन वर्षे कारखान्याला ऊस घातलेला नाही, त्यांना अक्रियाशील सभासद ठरवण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. त्यामुळे आपण क्रियाशील सभासद आहोत, की अक्रियाशील, याची माहिती मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावरच अनेकांना कळणार आहे.
चौकट :
...तर आक्षेप घेतले जाणार
मुळातच संस्थापक पॅनलच्या कार्यकर्त्यांनी वाढीव सभासदांबाबत साखर आयुक्त व कराड पोलिसात तक्रार दिली आहे. जमीन नावावर नसतानाही काहींना सभासद करून घेतल्याचा त्यांचा आक्षेप आहे. आक्षेप घेतलेली नावे पुन्हा मतदार यादीत आली तर त्या नावांवर पुन्हा आक्षेप घेतले जाणार यात शंका नाही. पण, यादीत कोणाची नावे येतात, याची प्रतीक्षा साऱ्यांनाच लागून राहिली आहे.
फोटो :कृष्णा कारखाना