पाहुणी म्हणून आलेली आई निष्ठुर बनून गेली!
By Admin | Updated: July 27, 2016 00:30 IST2016-07-27T00:17:41+5:302016-07-27T00:30:42+5:30
मुलाला सोडून पलायन : उंब्रज येथील केळीवाल्या शोभा कांबळे यांनी चौदा दिवस केला सांभाळ

पाहुणी म्हणून आलेली आई निष्ठुर बनून गेली!
अजय जाधव ल्ल उंब्रज
रक्ताची माणसं नाती विसरतात, तेव्हा समाजातील माणसं ती जोडतात. माणुसकी संपत चाललीय अशी ओरड होत असतानाच हे खोटं ठरविणारी घटना उंब्रजमध्ये घडली. पाहुणी म्हणून आलेली आई पोटच्या गोळ्याला सोडून गेली. तेव्हा तिचा शोभा कांबळे यांनी ‘माँ’ बनून सांभाळ केला.
याबाबत माहिती अशी की, येथील बाजारपेठेत शोभा कांबळे या अनेक वर्षांपासून केळी विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवार, दि. १४ रोजी त्या नेहमीप्रमाणे केळी विकत असताना सायंकाळी सातच्या सुमारास भुकेने व्याकूळ झालेली एक महिला दोन वर्षांच्या मुलासह शोभा यांच्याकडे आली. ती स्वत:चं नाव कोमल शिंदे असे सांगत होती. तर मुलाचं नाव यश असल्याचे सांगितले.
‘खूप भूक लागलीय, आम्ही दोघं उपाशी आहोत,’ असे ती म्हणू लागली. शोभा यांना तिचा कळवळा आला. पोराकडे बघितलं तर ते पण हसलं. शोभा यांनी टोपलीतील केळी मायलेकरांना खायला दिली. तेव्हा तिने शोभा यांच्याकडे मदत मागितली. ती म्हणाली, ‘मी गुलबर्गाची. मला कोणच नाही. मला जगण्यासाठी मदत कराल का?’
त्यावर शोभा कांबळे यांनी विश्वास ठेवला. त्यांनी कोमलसह यशला घरी आणले. जेवण केले, यशसाठी खेळणी, कपडे आणली. ही माहिती समजल्यावर शेजारी राहत असलेल्या वैशाली कांबळे तेथे आल्या.
त्यांना पाहिल्यानंतर यशने ‘माँ’ म्हणून झेप घेतली. त्या चौदा दिवस यशची आईच बनल्या आहेत. बुधवार, दि. २० जुलैला ती पुन्हा शोभा यांच्या घरी आली. २१ जुलैच्या पहाटे यशला शोभा यांच्या घरात ठेवून कोमल फरार झाली.
शोभा आणि वैशाली यांनी यशला लळा लावला. यश तक्षशिलानगरमध्ये बागडू लागला. अनेकजण त्याला माया लावू लागले. पण शोभा यांनीही जास्त वेळ न घालवता पोलिस ठाणे गाठले.
त्यावर हवालदार शिवाजी जगताप यांनी घाईत निर्णय न घेता कोमल परत येते का? हे पाहण्याचा निर्णय घेतला. ही घटना सहायक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांना सांगितली; पण कोमल परत आलीच नाही.
अनेक प्रश्न निरुत्तरीत
४काही दिवसांमध्ये हसऱ्या स्वभावाच्या दोन वर्षांच्या यशने सर्वांना आपलेसे केले होते. त्याला बालसुधार गृहात पाठविताना शोभा कांबळे, वैशाली कांबळे, बीट अंमलदार शिवाजी जगताप यांचे डोळे पाणावले होते; पण अनेक प्रश्न निरुत्तरीत राहिले आहे. यश आणि कोमल नक्की कोण आहेत?, कोमल खरोखरच यशची आई होती का? की तिने त्याला पळवून आणले? यासारखे अनेक प्रश्न सतावत आहेत.
बालसंगोपन गृहात यश
४प्रेम, माया यापेक्षाही कायदा महत्त्वाचा आहे. खाकीला कायद्यानेच वागावे लागते. उंब्रज पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी मंगळवारी यशला घेऊन बालसुधार गृहात गेल्या. त्यांच्यासोबत शोभा आणि वैशाली याही होत्या. तेथून त्याची म्हसवडच्या बालसंगोपन केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.