कास पुष्प पठाराला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:21+5:302021-09-07T04:46:21+5:30
पेट्री : कास पठारावर पर्यटकांचा ओघ वाढतच चालला असून, शनिवार, रविवारी हजारो पर्यटकांनी कासला भेट दिली. रविवारी सायंकाळी पोलीस ...

कास पुष्प पठाराला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट
पेट्री : कास पठारावर पर्यटकांचा ओघ वाढतच चालला असून, शनिवार, रविवारी हजारो पर्यटकांनी कासला भेट दिली. रविवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सहकुटुंब कास पठाराला भेट देऊन कास पठार कार्यकारी समितीच्या नियोजनाचे कौतुक केले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, ‘कासपठार कार्यकारी समितीचे काम सुंदर चालले असून, वनविभाग व समिती अशा लोकसहभागातून पठाराचे व्यवस्थापन व्यवस्थित चालले आहे. पर्यटकांना कोणताही त्रास होताना दिसत नाही. कोणत्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा दिसला नाही. तसेच वनव्यवस्थापन समिती, वन विभागाकडून कास पठाराच्या सौदर्यांचा प्रसारही करतील आणि संरक्षणही करतील, याची मला खात्री आहे. पठारावरील निसर्ग खूप छान असून, येथे येऊन आनंद झाला.’
शनिवार, रविवारी मिळून साधारणत: पाच हजार लोकांनी पठाराचे दर्शन घेतले. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे कास पठारावरील हंगाम बंद होता. यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्यामुळे २५ ऑगस्टपासून पठाराचा हंगाम सुरू झाला. पठारावर येणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पठारावर पर्यटकांना सोडण्यासाठी दिवसभरात चार स्लाॅट करण्यात आले आहेत. प्रत्येक स्लाॅटमध्ये प्रत्येकी ७५० पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. निर्बंध शिथिल केले, तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पर्यटकांनी मास्क सक्तीचा आहे व कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
फोटो : ०६पेट्री
कास पुष्प पठारावर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचा सत्कार करण्यात आला.
(छाया -सागर चव्हाण)