ग्रामस्थांनी राबविले स्वच्छता अभियान
By Admin | Updated: January 19, 2015 00:25 IST2015-01-18T22:07:09+5:302015-01-19T00:25:41+5:30
सर्वांनी मिळून स्वच्छता केल्यामुळे गाव एकदम चकाचक झालेला पाहायला मिळत आहे.

ग्रामस्थांनी राबविले स्वच्छता अभियान
कुडाळ : खर्शी-बारामुरे ग्रामपंचायतीत राजपुरेवाडी, बलकावडेवाडी, पार्टेवाडी, बिरामणेवाडी, गावडेवाडी अशा वाड्यांचा समावेश होतो. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी एकी दाखवून निवडणूक बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी एकी दाखवून निवडणूक बिनविरोध पार पाडली. तर नूतन सदस्यांनी खुर्चीवर असताच गावच्या विकासासाठी विकास समितीची स्थापना केली. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग विशेषत: महिलांनी गावात स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली. सर्वांनी मिळून स्वच्छता केल्यामुळे गाव एकदम चकाचक झालेला पाहायला मिळत आहे.ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक पार पडणे म्हणजे तालुक्याला एक आदर्श आहे. एकत्र आलेल्या एक गाव व पाच वाड्यांमधील नागरिकांनी गावचा विकास गावातील सोयी-सुविधांना प्राधान्य मिळावे, यासाठी विकास समिती स्थापन केली आहे. तर रविवारी गावाने एकत्र येऊन गावची स्वच्छता करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला या घरातून फावडे, खराटा, घमेले, टिकाव घेऊनच घरातून बाहेर पडले. कोण आले, कोण आले नाही, याची वाट न बघता सारा गाव व वाड्यांमधील लोकांनी गावातील मंदिर परिसर, शाळा परिसर, अंतर्गत रस्ते स्वच्छ केले.
गावकऱ्यांच्या एकीमुळे गावातील स्वच्छता मोहीम यशस्वी झाली तर अनेक दिवसांपाूसन नदीकडेला असलेली अस्वच्छता दूर झाली. गावात प्रवेश करताच प्रसन्न वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत
आहे. (वार्ताहर)
सर्व सदस्य, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन हे स्वच्छता अभियान सुरू केले आहे. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसादही चांगला दिला आहे. यापुढेही गावच्या विकासासाठी ग्रामस्थ, नूतन सदस्य प्रयत्नशील राहतील.
- जयवंत कदम,
सरपंच, खर्शी-बारामुरे