कास पठारावर विविधरंगी फुलांचे दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:36+5:302021-08-29T04:37:36+5:30

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी दुर्मीळ फुलांचे दर्शन होऊ लागल्याने सध्या तुरळक प्रकारची अनेकविध फुले पाहायला मिळत ...

View of various flowers on Cas Plateau! | कास पठारावर विविधरंगी फुलांचे दर्शन!

कास पठारावर विविधरंगी फुलांचे दर्शन!

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी दुर्मीळ फुलांचे दर्शन होऊ लागल्याने सध्या तुरळक प्रकारची अनेकविध फुले पाहायला मिळत असून काहीच दिवसांत गालिचा पाहावयास मिळेल, असे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून हंगाम सुरू झाल्याने बहुतांशी पर्यटक कास पठाराकडे पर्यटनास येत असून आतापर्यंत पर्यटकसंख्या एक हजाराच्यावर गेली आहे.

सीतेची आसवे :

सह्याद्री पठारावरच्या गवतात दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते. अचानकपणे सप्टेंबरमध्ये फुले दिसून येतात. ही फुले अतिशय सुवासिक व सुंदर असतात. निळसर रंगाचे फूल, त्यावर पांढऱ्या रंगाचा ठिपका असतो. ही वनस्पती फुलांच्या सुवासाने कीटकांना आकर्षित करते.

तेरडा :

सह्याद्रीच्या रांगांत अनेक महत्त्वाच्या भागात सप्टेंबर म्हणजेच गौरी-गणपती सणाच्या आसपास ही वनस्पती उगवते. हिला तेरडा किंवा गौरीची फुले म्हणतात. ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त, वारा जास्त, हवा थंड या सर्व बाबी आढळत असल्यामुळे हा तेरडा जास्त उंच वाढत नाही. असा तो सडा भागातील लावी जातीचा जांभळा तेरडा आहे. याचा पंधरा ते वीस दिवस दिनक्रम चालू राहतो. जांभळ्या तेरड्याने पठार व इतर सडे उठून दिसतात.

गेंद :

गवतवर्गीय वनस्पती आहे. धनगर जसा फेटा घालतो त्याप्रमाणे या गवताच्या दांड्यावर टोपीसारखा भाग येतो म्हणून यास धनगर गवत म्हणतात. पांढरा रंग फुलून भरपूर प्रमाणात दिसतो म्हणून गेंद म्हणतात.

ड्रोसेरा बुरमानी/लाल दवबिंदू

ही कीटकभक्षी वनस्पती आहे. सप्टेंबर महिन्यात येते. देठ हिरव्या व लाल रंगाचा असतो. त्यावर केस वाहिन्यांचे जाळे असते. स्थानिक नाव लाल दवबिंदू आहे.

मोठी गौळण (पोगॅस्टमन डेकनांसीस)

सप्टेंबर महिन्यात पाणी साचते व आटते. अशा ठिकाणी ही वनस्पती दिसते. त्यावर लहान पानांमधून तुरा येतो. याची फुले निळसर रंगाच्या तुऱ्याप्रमाणे असतात. घरातील तुळशीच्या मंजिरी ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे याचे तुरे दिसतात. म्हणून यास निळी मंजिरीदेखील म्हणतात.

भुईकारवी (टोपली कारवी)

जमिनीवर टोपलीसारखा आकार असतो म्हणून टोपली कारवी म्हणतात. याच्या पानांना छोटे पांढरट रंगाचे केस असतात. सूर्याचे किरण पडल्यावर सुंदर व मोहक दिसतात. याच्या मुळापासून फुटवा येतो व त्याचा प्रसार होतो.

अभाळी

ही गवतवर्गीय वनस्पती आहे. याची पाने व देठ जाडसर असतात. त्यावर सप्टेंबरच्या आसपास आभाळी रंगांचे कप्प्याकप्प्याचे फूल येत असते. त्याच्यावर अनेक भाग दिसतात.

कंदीलपुष्प

ही वेलवर्गीय वनस्पती असून एकूण सात जातींपैकी दोन जाती गवतवर्गीय आहेत. जून ते सप्टेंबरपर्यंत फुले येतात. एखाद्या माणसाने हातात कंदील घेतला आहे असे वाटते म्हणून कंदीलपुष्प म्हणतात.

कोट

पठारावर साधारण तीस ते पस्तीस टक्के फुले फुलली असून ऊन व पाऊस असे वातावरण राहिल्यास काहीच दिवसांत मोठ्या प्रमाणावर फुलांचे गालिचे पाहावयास मिळणार आहेत. फुले पाहत असताना फुलांचे नुकसान होणार नाही याची दक्षता पर्यटकांनी घ्यावी. आम्हाला सहकार्य करून फुलांचे सौंदर्य टिकवावे.

- मारुती चिकणे, अध्यक्ष कास पठार कार्यकारी समिती

छाया - सागर चव्हाण

Web Title: View of various flowers on Cas Plateau!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.