मोबाईल व्हॅनची सुविधा : मकरंद पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : ‘वाई तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ग्रामीण व अतिशय दुर्गम भागातून पशुरुग्णांना दवाखान्यात आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बळीराजाचे पशुधन वाचण्यासाठी वैद्यकीय सेवा वेळेत त्यांना मिळणे आवश्यक असून, त्यासाठीच वाईतील शहाबाग येथे असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे,’ असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी मोबाईल व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना काढले.
शहाबाग येथील वाई पशुवैद्यकीय दवाखान्यात मोबाईल व्हॅनच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे अध्यक्ष मंगेश धुमाळ, पंचायत समितीचे उपसभापती पै. विक्रांत डोंगरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, डॉ. नेवसे, डॉ. हगवणे, सर्व पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील म्हणाले, ‘वाईचा पश्चिम भाग अतिशय दुर्गम असून, या परिसरात दुभत्या जनावरांच्या अनेक समस्या आहेत. काहीवेळा अतिप्रसंग निर्माण झाल्यास वैद्यकीय सेवा न मिळाल्याने जनावरे दगावण्याची शक्यता निर्माण होते. या भागात अतिवृष्टी होते. पावसाळ्यात त्यामुळे दुभत्या जनावरांचे अनेक आजार डोके वर काढतात. अशावेळी मोबाईल व्हॅनचा उपयोग झाल्यास जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल. शेतकऱ्यांचे नुकसान टळेल. हा उद्देश समोर ठेवूनच आमदार फंडातून मोबाईल व्हॅनची सोय करण्यात आली आहे.’