शालेय गणवेश बनविणाऱ्यांसह विक्रेते अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:19+5:302021-06-23T04:25:19+5:30
तरडगाव : कोरोना संकटामुळे सर्वत्र शाळा, महाविद्यालये अजून बंदच आहेत. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट गणवेश ठरलेला असतो. शाळा सुरू ...

शालेय गणवेश बनविणाऱ्यांसह विक्रेते अडचणीत
तरडगाव : कोरोना संकटामुळे सर्वत्र शाळा, महाविद्यालये अजून बंदच आहेत. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट गणवेश ठरलेला असतो. शाळा सुरू होण्यापूर्वी कारागीर हे गणवेश तयार करण्याच्या कामाला सुरुवात करीत असतात. मात्र गेली दीड वर्षे शाळा बंद आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शाळा सुरू होतील की नाही हे सांगता येत नसल्याने गणवेश शिवणारे कारागीर व विक्री करणारे व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत.
कोरोनापूर्वी नियमित शाळा सुरू होत्या. त्या वेळी विद्यार्थी टेलरिंग व्यावसायिकाकडून गणवेश शिवून घेत असत. काही विद्यार्थ्यांचे पालक दुकानांमधून रेडिमेड गणवेश खरेदी करीत होते. कित्येक ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर शाळेमध्ये गणवेशाचे वितरण केले जात होते. मात्र गेल्या दोन हंगामात व्यावसायिकांचा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कोरोना महामारीमुळे या काळात शाळाच बंद राहिल्याने गणवेशाचा प्रश्नच निर्माण झाला नाही.
सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेला जेमतेम पैशात घरखर्च भागविणे अवघड झाले असताना नवीन कपड्यांची खरेदी हे तर फार दूरची गोष्ट बनली आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याची संमती दिल्याने अनेकांनी घरीच विवाह उरकले आहेत. यामुळे कपडे शिवून घेणे थांबले आहे. अनेकांनी तयार कपड्यांवर भर दिल्याचे दिसते. याचा परिणाम शिवणकाम करणाऱ्या व्यवसायावर झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे.
नियमांच्या अधीन राहून सर्व दुकाने व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली गेली असल्याने दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. तसेच अनावश्यक खर्च टाळून सर्वसामान्यांकडून वेळ भागविणे सुरू आहे. यामुळे टेलरकडून नवीन कपडे शिवून घेणे अथवा खरेदी करणे हे प्रमाण सध्या तरी कमी झाले असल्याचे दिसते.