भाजी व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर संक्रांत !
By Admin | Updated: April 4, 2015 00:02 IST2015-04-03T22:42:17+5:302015-04-04T00:02:28+5:30
माल मंडईत घेऊन जागेवरच विक्री : समर्थ भाजी मंडईचा वाद पुन्हा पेटणार ; विक्रेते आंदोलनाच्या पवित्र्यात

भाजी व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर संक्रांत !
सातारा : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील भाजी मंडईचा वाद पुन्हा नव्याने पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजार समितीच्या समोर दररोज सकाळी भरणाऱ्या मंडईमुळे श्री समर्थ सर्वधर्म महिला मंडळाच्या भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांंच्या नावाखाली अन्य तालुक्यातील व्यापारी मार्केटमधूनच खरेदी करून तिथे भाजी विकत आहेत. बाजार समिती, नगरपालिका, वाहतूक पोलिसांकडे अनेकदा तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. ही मंडई बेकायदेशीर असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा श्री समर्थ सर्वधर्म महिला मंडळातील व्यापाऱ्यांनी दिला आहे.शहरातील पोवई नाक्यावर भरणाऱ्या भाजी मंडईचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक वेळेस कोणती ना कोणती संघटना आंदोलन करते, त्यानंतर त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचा तोडगा काढला जातो; परंतु या वादावर कायमस्वरूपी तोडगा अद्यापही निघाला नाही. काही दिवसांपूर्वी डी. बी. कदम मार्केटच्या समोर रस्त्यावरच मंडई भरत होती. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत होती. तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी मंडई भरण्यास मनाई केल्यानंतर शेतकरी संघटनेने आंदोलन केले. त्यामुळे राधिका रस्त्यावर मंडई भरू लागली. तरीसुध्दा वाहतूक कोंडीची समस्या सुटली नाही. त्यानंतर पुन्हा मंडई भरण्यास मनाई करण्यात आली. तेव्हा पुन्हा शेतकरी संघटनेने आंदोलन केले. या आंदोलनानंतर बाजार समितीच्या समोरील मोकळ्या जागेत सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत शेतकऱ्यांंना होलसेल दरात भाजीविक्री करण्यास परवानगी देण्यात आली. त्यासाठी दहा किलोच्या वर भाजीविक्री करावी, अशी अट ठेवण्यात आली होती.
त्यासाठी बाजार समितीने मोकळ्या जागेचे सपाटीकरण करून तिथे खडी टाकली. त्यामुळे अनेक शेतकरी तिथे भाजीविक्रीसाठी बसू लागले. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाखाली अन्य तालुक्यातील व्यापारी मार्केट कमिटीतून होलसेलमध्ये भाजी घेऊन या मंडईत भाजीची किरकोळ विक्री करू लागले आहेत. सुरुवातीला येथे २५ ते ३० विक्रेते बसत होते. परंतु आता ही संख्या दोनशेच्या वर गेली आहे. या परिसरात पुन्हा वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली असून, अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नाही. (प्रतिनिधी)