वेण्णा लेकला हिमकणांची चादर!
By Admin | Updated: February 5, 2016 00:58 IST2016-02-05T00:56:29+5:302016-02-05T00:58:48+5:30
तापमान १५.२ अंश : वर्षातील ही पहिलीच घटना

वेण्णा लेकला हिमकणांची चादर!
महाबळेश्वर : महाबळेश्वरचे तापमान गुरुवारी पहाटे अचानक खाली आले. यामुळे दवबिंदूचे रूपांतर हिमकणात होऊन वेण्णा लेक परिसरातील स्पंज जम्पवर तसेच वाहनांच्या छतावर हिमकणांची चादर अंथरली गेली होती.
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची तुरळकच गर्दी आहे. थंडीच्या कडाक्यामुळे वेण्णा लेक परिसरात व लिंगमळापर्यंतच्या भागात थोड्या फार प्रमाणात दवबिंदू गोठल्यामुळे हिमकण पाहावयास मिळाले. हवामान खात्याच्या नोंदीनुसार शहरातील कि मान तापमान १५.२ अंश सेल्सिअस होते, तर वेण्णा लेक परिसरातील अंदाजे ९ अंश सेल्सिअस पेक्षा कमी असेल.
दवबिंदूचे रूपांतर हिमकणात होण्याचे या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. वेण्णा लेक परिसर ते लिंगमळा या चार किलोमीटर परिसरात हिमकण पाहण्यास मिळतात. गेल्या आठवड्यापासून थंडीच्या प्रमाणात होत असलेल्या वाढीमुळे पुढील दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमकण पाहण्यास मिळेल, असा अंदाज येथील स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
यापूर्वी १२ डिसेंबर २०१४ रोजी वेण्णा लेक व लिंगमळा परिसरात दवबिंदूचे रूपांतर हिमकणामध्ये झालेले दिसून आले होते. मात्र वातावरणातील बदलामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यांत थंडी असूनही हिमकण पाहावयास मिळाले नाहीत. (प्रतिनिधी)