वटग्रामचे झाले वडगाव
By Admin | Updated: April 4, 2015 00:03 IST2015-04-03T22:14:28+5:302015-04-04T00:03:37+5:30
नांदनी नदीकाठी गाव : हुतात्म्यांच्या पदस्पशार्न पावन भूमी--नावामागची कहाणी-सहवीस

वटग्रामचे झाले वडगाव
राजू पिसाळ - पुसेसावळी -सहाशे वर्षांची संत परंपरा व हुतात्म्यांच्या देशभक्तीने पावन झालेल्या वडगावचे सध्याचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज हे वडगाव संस्थानची व भागवत धर्माची अखंड सेवा करत होते. सातारा-सांगलीच्या हद्दीवर वडगाव हे गाव नांदनी नदीकाठी वसले आहे. पूर्वी या गावचे नाव वटगाव म्हणजे ‘नेग्रोदग्राम’ होते. शांतिलिंगाप्पा यांनी शिष्य श्री कृष्णाप्पास्वामी यांना उपदेश केला की वटग्रामी या गावी जाऊन प्राचीन भवानी शंकर मंदिरात उपासना करावी. श्री कृष्णाप्पास्वामी यांनी शके १५०४ मध्ये भवानी शंकर मंदिराशेजारी मठाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. या कार्यासाठी त्यांना उत्तम शिष्यांची उणीव भासत होती.अहमदनगर जिल्ह्यातील कातराबाद मांडवगण येथील भिकाजी देशपांडे व कृष्णाबाई देशपांडेचे यांच्या घरी शके १५२१ म्हणजे इ.स. १५९९ ला गोकुळ अष्ठमीच्या दिवशी श्री जयराम स्वामी यांचा जन्म झाला. श्री जयराम स्वामी यांनी श्री आंबेजोगाई मातेची फार उपासना केली. तेव्हा श्री मातेच्या आशीर्वादाने व उपदेशाने ते पंढरपूरला गेले. पंढरपूरमध्ये तपश्यर्चा करत असताना त्यांची भक्ती व निष्ठा पाहून पांडुरंग प्रसन्न होऊन त्यांच्या बरोबर पश्चिमेला सुमारे शंभर किलोमीटर वटग्रामच्या माळावर आले. त्याठिकाणी पांडुरंग गुरू श्री कृष्णाप्पास्वामी व श्री जयराम स्वामी यांचा त्रिवेणी संगम झाला. आज त्या माळाला ‘विठोबाचे माळ’ म्हणून ओळखले जाते.श्री जयराम स्वामींच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ पंचायतन, संत तुकाराम महाराज व संत बहिणाबाई यांच्याबरोबर आध्यात्मिक सलोखा होता. श्री कृष्णाप्पास्वामी यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर मठाची धुरा सांभाळून भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी वडग्राम संस्थानची धुरा सांभाळून आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारून आसाच वारसा पुढे चालू ठेवण्याच्या परंपरा निर्माण केली. स्वामींच्या भक्ती कार्यामुळे वाड्मयामुळे वडग्रामचे नाव ‘वडगाव जयराम स्वामी’ नावाने ओळखले जात आहे.
कासार घाटावर मठ
श्री जयराम स्वामी वडग्राम या ठिकाणी आल्यानंतर श्री कृष्णाप्पास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपासना करत असताना ग्रंथनिर्मिती करण्यास सुरुवात केली. श्री जयराम स्वामी यांचा संत स्नेह फार होता. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करत भारत भ्रमण करताना पंढरपूर येथे कासार घाटावर विठ्ठल भक्तांसाठी मठ बांधला.