‘वजराई’च्या वेगाला भुलली वीज - : परळी खोऱ्यातील नागरिकांनी मुंबईत स्थापन केलेल्या मंडळाचा पुढाकार
By Admin | Updated: August 11, 2014 00:14 IST2014-08-10T23:14:20+5:302014-08-11T00:14:54+5:30
सतराशे फुटांवरून जलप्रपात

‘वजराई’च्या वेगाला भुलली वीज - : परळी खोऱ्यातील नागरिकांनी मुंबईत स्थापन केलेल्या मंडळाचा पुढाकार
परळी : देशातील सर्वांत उंच धबधबा म्हणून वजराई धबधब्याची ओळख आहे. सुमारे सतराशे फूट उंचीवरून पाणी कोसळत असल्यामुळे याठिकाणी वीजनिर्मिती होऊ शकते. शिवाय हा धबधबा बारमाही कोसळत असल्यामुळे येथे वीजनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. याबाबत महावितरण कंपनीशी चर्चा सुरू असल्याची माहिती परळी खोऱ्यातील मुंबई मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली. सुमारे सोळाशे ते सतराशे फुटांवरून कोसळणाऱ्या ‘वजराई’चा थरार आता जवळून अनुभवता येणार आहे. धबधब्याच्या समोर प्रेक्षा गॅलरी बांधण्याचे नियोजन असून पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटता यावा, यासाठी या परिसरात विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. कास पुष्प पठार, ठोसेघरचा धबधबा, सज्जनगड, चाळकेवाडीचे पवनचक्की पठार, उरमोडी, कण्हेर धरण अन् रानफुलांनी बहरलेला हिरवागार परिसर यामुळे साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे. आता त्यात भर पडली आहे ती भांबवली येथील वजराई धबधब्याची. निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे. कास पठारावरील वजराई धबधबा सोळाशे आणि सतराशे फुटांवरून दोन टप्प्यांत कोसळत आहे. त्यामुळे पाणी पडण्याचा वेग प्रचंड आहे. या नैसर्गिक स्थितीचा वापर वीजनिर्मितीसाठी चांगल्याप्रकारे होणार आहे. यामुळे भविष्यात विजेचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. समुद्रसपाटीपासून देशातील सर्वांत उंच असणारा धबधबा म्हणून याची ओळख आहे. पर्यटनाच्या दृष्टीने याचे महत्त्व वाढले असून ‘वजराई’चा जलप्रपात समोरून अनुभवता यावा, पर्यटकांना सुरक्षित निसर्गाचा आनंद लुटता यावा, याठिकाणी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पर्यटन विकास महामंडळ व आमदार निधी या माध्यमातून आता येथे विविध सुविधांबरोबरच प्रेक्षा गॅलरी उभारण्यात येणार आहे. या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर) वजराईचा धबधबा भांबवली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटकांना याठिकाणी व्यवस्थित पोहोचता यावे, यासाठी पादचारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी सिमेंटचे बाक, विश्रामगृह आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जिल्ह्याचा पश्चिम भाग नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. येथील निसर्गसौंदर्याचा लाभ उठवून पर्यटन क्षेत्रासाठी प्रयत्न व्हावेत. वनाच्छादित भाग असल्यामुळे अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. त्यावर प्रक्रिया करणारे छोटे उद्योग सुरू करता येऊ शकतात. याठिकाणी दरवर्षी राज्यभरातून हजारो पर्यटक भेटी देतात. रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केल्यास स्थानिकांना फायदा होईल.