वडूजला रणनीती आखण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST2021-09-03T04:42:04+5:302021-09-03T04:42:04+5:30

शेखर जाधव लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होत असल्याने खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजमध्ये राजकीय हालचालींनी ...

Vaduz in strategy | वडूजला रणनीती आखण्यात

वडूजला रणनीती आखण्यात

शेखर जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होत असल्याने खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूजमध्ये राजकीय हालचालींनी वेग आला आहे. सत्ताधारी, विरोधक आणि इच्छुक उमेदवारांकडून आतापासून निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. सत्ताधारी गटाने शहरातील विकासकामे घाई गडबडीत पूर्ण करण्याचा घाट घातला आहे. तर विरोधी गट उमेदवार चाचपणीत व्यस्त आहे. वाॅर्ड रचना व आरक्षणानंतर लढतीत आमनेसामने कोण हे येणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

वडूज ग्रामपचांयतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यांनतर येथील राजकारणात अनेक फेरबदल झाले. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? असा प्रश्न येथील मतदारांना पडला. जनतेच्या मूलभूत समस्येवर विरोधी पक्ष चुप्पी साधून आहे. त्यामुळे आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र कसे असेल हे वॉर्ड आरक्षणावर अवलंबून आहे. सद्य:स्थितीत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी, कॉँग्रेस व शिवसेना यांच्यात कशाप्रकारे युती होणार, नाराज इच्छुक उमेदवार ऐनवेळी अपक्ष लढणार का? यामुळे ही निवडणूक तिरंगी का चौरंगी होणार याकडे मतदाराचे लक्ष लागले आहे.

१७ नगरसेवक असलेल्या वडूज नगरपंचायतीची २०१६ ची निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ५, राष्ट्रीय कॉँग्रेसच्या ५, भाजपच्या ३ तर अपक्ष ४ नगरसेवकांनी विजय मिळविला. नगरपंचायतीत प्रथम राष्ट्रवादी, अपक्ष व भाजप अशी सत्ता स्थापन झाली. यांनंतर बऱ्याच घडामोडी घडल्या अन् राष्ट्रवादीने भाजपाच्या तीन व एका अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन नगरपंचायतीत सत्ता स्थापन केली अन् सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरू केला.

वडूजची जनता सोशिक व शांत समजली जाते. येथील जनतेला आजवर प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी विकासकामांचे गाजर दाखवले आहे. अपवाद वगळता विकास कामांचा पाठपुरावा न झाल्याने शहराचा विकास साधण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले. सत्ताधाऱ्यांनी स्मशानभूमी, शववाहिका या व्यतिरिक्त कोणतेही अन्य ठोस काम केले नाही. विरोधी गटाने प्रत्येक मासिक सभेत सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न न केल्याने याचा शहराच्या विकासावर परिणाम झाल्याचे दिसते. सत्ताधारी व विरोधक यांची अंतर्गत हातमिळवणी तर झाली नसेल ना असा प्रश्न येथील जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. गेल्या साडेचार वर्षांत तालुक्याच्या राजकारणाबरोबरच नगरपंचायत हद्दीतील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे सत्ताधारी कोण? आणि विरोधी गटात कोण? हे सध्यातरी ओळखणे कठीण बनले आहे. नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच येथील नगरपंचायतीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. शहरातील अंतर्गत गटारे, कॉँक्रिटीकरण, प्रस्तावित मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण या व्यतिरिक्त दिसण्यासारखे मोठे भरीव काम करण्यास सत्ताधारी मंडळींना अद्याप तरी यश आल्याचे दिसून येत नाही. या पाच वर्षात कामे बोटावर मोजण्या इतपत झाली, पण सभागृहात विकासकामांचे ठराव मात्र हजारोंच्या संख्येने केले गेले.

जोड..

Web Title: Vaduz in strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.