वडूज पोलीस इमारतीला अखेर मुहूर्त सापडला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:45 IST2021-09-24T04:45:47+5:302021-09-24T04:45:47+5:30
शेखर जाधव लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : येथील जुने पोलीस स्टेशन नवीन अद्ययावत अशा ग्रीन इमारतीमध्ये काही दिवसांतच ...

वडूज पोलीस इमारतीला अखेर मुहूर्त सापडला...
शेखर जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : येथील जुने पोलीस स्टेशन नवीन अद्ययावत अशा ग्रीन इमारतीमध्ये काही दिवसांतच गृहप्रवेश करून पोलीस स्टेशनचा कारभार या नूतन इमारतीत सुरू होईल, असे वाटत होते. मात्र, गत दीड वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली ही ग्रीन इमारत गृहप्रवेशासाठी वाट पाहत आहे. अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी गृहप्रवेशासाठी हालचाली गतिमान केल्या आणि शनिवार, दि. २५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तर, भाडेतत्त्वावरील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या पोलीस ठाणे इमारतीत येणार का, असा सवालही नागरिकांमधून उमटत आहे.
तालुक्याच्या मुख्यालयात नव्या-जुन्या इमारतींचा सुळसुळाट होऊन त्या ठिकाणच्या इमारती परिसर भकास वाटू लागला आहे. त्यामुळे तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या वडूजनगरीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. जुने तहसील व पोलीस ठाणे सुस्थितील दगडी इमारतीमधून यापूर्वीच ‘तहसील कार्यालय गेलं, आता पोलीस स्टेशनही चाललंय’, त्यामुळे जुनी तहसील इमारतही वापराविना अडगळ होण्याची शक्यता आहे.
वास्तविक पाहता जुनी तहसील इमारत नगरपंचायतीला नाममात्र भाडेतत्त्वावर मिळत असताना होणारी टाळाटाळ खेदजनक आहे. सध्या भाडेतत्त्वावर असणारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय याठिकाणी स्थानापन्न व्हावे, यासाठी खटाव तालुक्यात एकजुटीने प्रयत्न होणे काळाची गरज आहे. विविध संघटना, राजकीय नेतेमंडळी यासाठी आग्रही असले तरी आजपर्यंत जनआंदोलनाशिवाय या भूमीला न्याय मिळाला नाही, हे त्रिवार सत्य आहे. खटाव तालुक्यातील वडूज येथे दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हे गत अठरा वर्षांपासून भाडेतत्त्वावर आहे. खटाव तालुक्यातील वडूज, औंध, मायणी, पुसेसावळी पोलीस ठाणे तर माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी हे दोनच पोलीस ठाणे या विभागांतर्गत कार्यरत आहेत. वडूजमध्ये जिल्हास्तरीय न्यायालय, कनिष्ठ न्यायालय असून, खटाव तालुक्याचा क्राइम रेट पाहता हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वडूज येथेच असणे फार महत्त्वाचे आहे.
चाैकट..
दीड वर्ष झाले फर्निचर येऊन..
प्रारंभी नगरपंचायत या ठिकाणी वास्तव्यास येणार होती. जिल्हाधिकाऱ्यांची नाममात्र भाडेतत्त्वावर मान्यता असतानादेखील या इमारतीचे नेमके नगरपंचायतीला वावडे का? हा सध्या फार मोठा संशोधनाचा विषय ठरत आहे. तसेच भव्य-दिव्य इमारतीमध्ये पोलीस ठाणे आता नूतन इमारतीत जाणार आहे. परंतु सुसज्ज व फर्निचर येऊनही गत दीड वर्षापासून हे पोलीस ठाणे राजकीय नेत्यांच्या गृहप्रवेशाच्या तारखा लिहिण्यातच धन्यता मानत होते.
चाैकट..
इमारतीतील दबदबा कायम राहील का?
वडूज पोलीस ठाणे नवीन अत्याधुनिक अशा जिल्ह्यातील पहिल्या ग्रीन इमारतीमध्ये स्थलांतर होत आहे. आता पूर्वीपासून भाडेतत्त्वावर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या पोलीस ठाणे इमारतीत आणून या इमारतीतील दबदबा कायम ठेवणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.
२३वडूज पोलीस ठाणे
फोटो: सुसज्ज वडूज पोलीस ठाण्याची नूतन ग्रीन इमारत. ( शेखर जाधव )