वडूज नगरपंचायतीने स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:39 IST2021-05-12T04:39:58+5:302021-05-12T04:39:58+5:30
वडूज : वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन गांधीगिरीच्या भूमिकेत आहेत. यांनी येत्या ...

वडूज नगरपंचायतीने स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारावे
वडूज : वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन गांधीगिरीच्या भूमिकेत आहेत. यांनी येत्या पाच दिवसात डोळ्यावरची पट्टी काढली नाही तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह मुख्याधिकारी यांना आयसोलेशन सेंटरमध्ये कोंडून ठेवण्याचा इशारा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.
कोरोनोच्या दुसऱ्या लाटेने वडूज शहरात धुमाकूळ घातला असताना शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी हे चूल धरून घरात बसले आहेत. वर्षभरात कचरा टेंडरसाठी स्वतंत्र बैठक झाली. परंतु कोरोनोसाठी एकही बैठक नगराध्यक्षांनी बोलावली नाही. वडूज शहरातील नागरिकांना हक्काचे बेड उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यूने थैमान घातले आहे. वास्तविक यापूर्वी नगरपंचायतीने १४व्या वित्त आयोगातून, नगरपंचायत फंडातून किंवा करापोटी जमा झालेल्या विकास शुल्कमधून वडूज शहरासाठी स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारणे गरजेचे होते. सध्या शहरातील नागरिकांना बेड मिळवण्यासाठी सातारा, कर्हाड, फलटण आदी ठिकाणी धडपड करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या मित्रमंडळातर्फे जन आंदोलनाचा हिसका दाखवल्यानंतर नगरपंचायतीने नवीन शववाहिका वडूजकरांच्या सेवेत सुरू केली. आता नगरपंचायत या शववाहिकेसाठी वडूजमधील नागरिकांकडून अंत्यविधीसाठी कररुपी पावती घेत आहे. यावरून सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा व उदासीनता दिसून येत आहे.
शहरातील नागरिकांना हॉस्पिटल हे युद्धभूमी वाटत असताना नगरपंचायत ही केवळ दिखाव्याच्या कामावर खर्च करत आहे. नगरपंचायतीने नवीन कोरोनो हॉस्पिटल उभारून शहरातील डॉक्टरांना सेवा देण्यासाठी साद घातली पाहिजे. तरच शहरातील नागरिकांचे हाल कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. नगरपंचायतीने येणाऱ्या पाच दिवसात हॉस्पिटल उभारले नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे, असा गर्भित इशारा शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.
(कोट)
गटारे, रस्ते, स्मशानभूमी, थायमास लॅम्प, कचरा टेंडर अशा मलईदार कामांमध्ये कायम व्यस्त राहणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना वडूजमधील नागरिकांचे हाल होत असतानादेखील पाझर फुटत नाही. या महामारीच्या काळात नगरपंचायत प्रशासन पूर्णतः असफल झाले असून, त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सामाजिक नैतिकता म्हणून संबंधितांनी राजीनामे द्यावेत.
- विजय गोडसे, नागरिक, वडूज