गर्भाशय नलिका जोडणीची शस्त्रक्रिया यशस्वी
By Admin | Updated: December 12, 2014 23:44 IST2014-12-12T22:20:40+5:302014-12-12T23:44:36+5:30
साताऱ्यात पहिला प्रयोग : वैद्यकीय क्षेत्रात रोवला मानाचा तुरा

गर्भाशय नलिका जोडणीची शस्त्रक्रिया यशस्वी
सातारा : गर्भाशय नलिका जोडणीची जगातील पहिली अवघड शस्त्रक्रिया साताऱ्यात यशस्वी झाल्याने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. माउली इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉ. रूपेश काटकर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
याबाबत माहिती देताना डॉ. काटकर म्हणाले, ‘शरीर म्हटले की प्रत्येकाचे वेगळेपण असते, प्रत्येकाचा चेहरा, उंची, जाडी वेगळी असते. काही लोकांना पाचऐवजी हाताला, पायाला सहा बोटे असतात. काहीना जन्मत: वेगवेगळे आजार किंवा जन्मदोष असतात. पुण्यातील आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लता देशमुख (नाव बदलले आहे) यांचा अनुभव काही वेगळाच. लग्नाला आठ वर्षे झाली होती. मात्र, त्यांना अपत्य होत नव्हते. यामुळे देशमुख दाम्पत्याने वेगवेगळ्या डॉक्टरांकडे अनेक तपासण्या केल्या. तपासणीनंतर त्यांना आयुष्यभर बाळ होणार नाही, असे सांगण्यात आले. देशमुख दाम्पत्याला पुण्यातील काही डॉक्टरांनी साताऱ्यातील माउली इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये जाऊन सल्ला घेण्यास सांगितले.’
देशमुख तपासणीसाठी साताऱ्यात आल्या. ज्यावेळी काटकर यांनी लता देशमुख यांची तपासणी केली, त्यावेळी त्यांना जन्मत:च दोन्ही गर्भाशय नलिकांमध्ये दोष असल्याचे आढळले. देशमुख यांच्या दोन्ही नलिकांमधील मध्यवर्ती जोडणारा भाग तयारच झाला नव्हता, असे निदान केले. या समस्येवर डॉ. काटकर यांनी गर्भाशय नलिका जोडणारे ‘फर्टिलिटी एनहान्सिंग आॅपरेशन’ करण्यास सांगितले. देशमुख दाम्पत्याने यासाठी सहमती दिली. यानंतर शस्त्रक्रिया केली आणि यशस्वी झाली. (प्रतिनिधी)
‘फर्टिलिटी एनहान्सिंग’ शस्त्रक्रिया
जन्मदोषांमध्ये गर्भाशयाची पिशवी नसणे, ओव्हरी नसणे, एखादी नलिका व तिचा पुढील भाग विकसित झालेला नसणे अशा केसेस बघायला मिळतात; पण फक्त नलिकेमधील मध्यभाग गायब असणे ही केस आजपर्यंत जगात कुठेही नोंदली गेली नव्हती. उपाय म्हणून केवळ टेस्ट ट्यूब बेबीचाच पर्याय देण्यात येतो. मात्र, कृत्रिम गर्भधारणा राहण्याचा प्रकार आला आणि ट्यूबल रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केली जाते. यामध्ये गर्भाशयाच्या नलिकांची टोके जी लांब गेली आहेत, ती जवळ आणायची व मायक्रोसर्जरीद्वारे जोडायची. यात केसापेक्षाही छोटा धागा वापरून हे आॅपरेशन केले जाते. याला ‘फर्टिलिटी एनहान्सिंग आॅपरेशन’ म्हणजेच ‘गर्भधारणा होण्यासाठी केलेली यशस्वी शस्त्रक्रिया’ म्हटले जाते.
देशमुख दाम्पत्याने या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याने लगेचच शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा राहण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला. अशी केस आजपर्यंत आरोग्यसेवेत कोठेही नोंदली गेलेली नाही. त्यामुुळे ही शस्त्रक्रिया साताऱ्यात प्रथम माउली इन्फर्टिलिटी व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांचे नावाने नक्कीच नोंदणीकृत राहील.
- डॉ. रूपेश काटकर