व्हीलचेअर असूनही होईना उपयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:35+5:302021-02-05T09:12:35+5:30

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज वीस ते बावीस हजार प्रवासी ये-जा करतात. त्यात दिव्यांगांचीही संख्या ...

Useless in a wheelchair! | व्हीलचेअर असूनही होईना उपयोग!

व्हीलचेअर असूनही होईना उपयोग!

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज वीस ते बावीस हजार प्रवासी ये-जा करतात. त्यात दिव्यांगांचीही संख्या मोठी असते. त्यांच्यासाठी महामंडळाने व्हीलचेअरची सोय केली आहे. मात्र, फारशी जनजागृती झालेली नसल्याने त्याचा वापर फारसा कोणी करीत नाही. त्यामुळे ती वापराविना पडूनच आहे.

पुणे, कोल्हापूर या दोन शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून मराठवाडा, विदर्भ, कोकणात शेकडो गाड्या जात असतात. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ या ठिकाणी असते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या दिव्यांगांचे हाल होऊ नयेत, यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करणे, रॅम्प उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यानुसार सातारा मध्यवर्ती बसस्थानकात राज्य परिवहन महामंडळाने एक व्हीलचेअर उपलब्ध करून ठेवली आहे. ती हिरकणी कक्षात ठेवलेली आहे.

बसस्थानकात गरजूंसाठी व्हीलचेअर उपलब्ध आहे. आवश्यकता असल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, या आशयाचा फलक वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ लावण्यात आला होता. मात्र, कालांतराने तो पडूनही गेला. मात्र अनेक नागरिकांना शासनाकडून पुरविल्या जात असलेल्या सुविधांची माहितीच नसते. त्यामुळे या व्हीलचेअरबाबत कोणीही मागणी करीत नसल्याचा अनुभव आहे. आतापर्यंत दोन-तीन वेळाच वापर झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घेऊन येणारी रिक्षा एसटीच्या दारापर्यंत आणली तरी अधिकारी आक्षेप घेत नाहीत.

चौकट :

हिरकणी कक्षात ठेवलेली

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात स्थानक प्रमुख कक्षेच्या समोर असलेल्या रुमचा प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी वापर केला जातो. या ठिकाणी हिरकणी कक्ष तयार केला आहे. त्यामध्येच एक व्हीलचेअर ठेवलेली आहे. कोणी मागणी केल्यास ती त्यांच्या नातेवाईकांकडे दिली जाते.

चौकट :

बसस्थानकात रॅम्पचा अभाव

ज्येष्ठ नागरिकांची व्हीलचेअर सहज आत नेता यावी यासाठी रॅम्प असणे आवश्यक आहे. मात्र, बसस्थानकात कोठेही तो दिसत नाही. बसस्थानकातील डांबरीकरण व बसस्थानक एक-दोन पायरीचे आहे. त्यामुळे फारसा त्रास होत नसला तरी रॅम्प केल्यास दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे.

कोट १

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात काही कामानिमित्ताने जावे लागते. अशावेळी आम्ही रिक्षा थेट आतमध्येच घेऊन जाण्याची विनंती करतो. रिक्षाचालकही सहकार्य करत नसल्याने व्हीलचेअरचा वापर करण्याची गरजच भासत नाही.

- कांतिलाल दुरंगे, ज्येष्ठ नागरिक सातारा.

कोट २

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध आहे, याबाबत कोठेही माहिती दिसत नाही. तसेच सोबत नातेवाईक असतील तरच त्याचा वापर करता येतो. पण याबाबत आणखी जनजागृती होणे गरजेचे आहे.

- जानकाबाई शिंदे

ज्येष्ठ नागरिक, सातारा.

कोट ३

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी सातारा बसस्थानकातील हिरकणी कक्षात व्हीलचेअर उपलब्ध करून ठेवली आहे. याबाबत फलकही लावलेला होता. त्याचप्रमाणे ध्वनीक्षेपकावरून उद्घोषणाही केली जाणार आहे. त्यामुळे गरजूंनी मागणी केल्यास ती उपलब्ध करून दिली जाईल.

- रेशमा गाडेकर

१२००

बसस्थानकातून दररोज ये-जा करणाऱ्या बसेस

२१०००

रोज प्रवास करणारे प्रवासी

तीन कॉलम फोटो जावेद खान काढणार आहेत.

Web Title: Useless in a wheelchair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.