Satara: किल्ले प्रतापगडच्या डागडुजीत चक्क कडाप्पाचा वापर, इतिहासप्रेमींमधून नाराजी 

By दीपक शिंदे | Published: February 6, 2024 05:53 PM2024-02-06T17:53:06+5:302024-02-06T17:53:24+5:30

किल्ल्याचे विद्रुपीकरण सुरू असल्याचा आरोप 

Use of Kadappa in the renovation of Pratapgad fort Satara | Satara: किल्ले प्रतापगडच्या डागडुजीत चक्क कडाप्पाचा वापर, इतिहासप्रेमींमधून नाराजी 

Satara: किल्ले प्रतापगडच्या डागडुजीत चक्क कडाप्पाचा वापर, इतिहासप्रेमींमधून नाराजी 

महाबळेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा असलेल्या किल्ले प्रतापगडाचे बुरूज ढासळत असतात. अनेक ठिकाणचे दगड निघाले आहेत. किल्ल्यावरील ध्वज बुरुजाच्या मुख्य भागाची डागडुजी सुरू आहे. काम करत असताना कडाप्प्याचा वापर केला जात आहे. यामुळे किल्ल्याचे सौंदर्य लोप पावत आहे. यामुळे इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात असून, काम सोमवारी बंद पाडले आहे.

सह्याद्रीच्या कुशीत असलेला किल्ले प्रतापगड आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे. ऊन, वारा, मुसळधार पाऊस अंगावर झेलत तो आजही दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या बुरुजाचे दगडेगोटे अधूनमधून पडत आहेत. वास्तविक पाहता पुरातत्व विभागाच्या नियमानुसार ऐतिहासिक वारसा जपायचा असेल तर ती वास्तू ज्या पद्धतीत बांधली असेल त्याप्रमाणेच दुुरुस्ती केली पाहिजे. त्यामध्ये कोठेही आधुनिकता येता कामा नये. तरीही प्रतापगडाचे काम करत असताना संबंधित ठेकेदार अन् मजूर कडाप्पा बसवत आहेत. यामुळे किल्ल्याचे मुख्य सौंदर्यच लोप पावणार आहे. चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवप्रेमींनी धाव घेऊन ते काम बंद पाडले. या कामाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

किल्ले प्रतापगड हा जागतिक वारसास्थळाच्या नामांकन यादीत आहे. त्यामुळे किल्ले प्रतापगडावर होणारी सर्व कामे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होण्याची गरज आहे. किल्ले प्रतापगडाची मुख्य ओळख असणाऱ्या ध्वज बुरुजाचे काम मागील दोन वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकवर्गणीतून करण्यात येत आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने खासगी ठेकेदार नेमण्यात आला आहे. या ठेकेदाराकडून नियमबाह्य काम केले जात आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. याच कामाचा एक भाग आहे जो काँक्रीटमध्ये करण्यात आला होता. ज्यामुळे किल्ल्याची शोभा जात आहे. हे काम झाकण्यासाठी दगडाचा वापर न करता चक्क कडप्पा फरशीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थ तसेच शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

यापूर्वी चक्क थर्माकोलचा वापर

मागील काही वर्षांपूर्वी याच ठेकेदाराकडून असेच निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. त्या कामामध्ये चक्क थर्माकोलचा वापर करण्यात आला आहे. मागे केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या विरोधाला न जुमानता काम सुरू ठेवण्यात आले. हे काम बंद करण्याची सूचना पुरातत्व विभागाने केली. त्यानंतर काम बंद करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदारावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हादेखील नोंदविला गेला आहे.

Web Title: Use of Kadappa in the renovation of Pratapgad fort Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.