मूत्रमार्गावरील सुटलेले नियंत्रण ठरतेय त्रासदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:33+5:302021-09-03T04:41:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मूत्रमार्गाविषयीच्या तक्रारींबाबत उघडपणे बोलण्यात संकोच वाटत असल्याने त्याचे उपचार व्हायलाही दिरंगाई होते. परिणामी मूत्रमार्गावरील ...

मूत्रमार्गावरील सुटलेले नियंत्रण ठरतेय त्रासदायक
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मूत्रमार्गाविषयीच्या तक्रारींबाबत उघडपणे बोलण्यात संकोच वाटत असल्याने त्याचे उपचार व्हायलाही दिरंगाई होते. परिणामी मूत्रमार्गावरील सुटलेले नियंत्रण अनेकांना त्रासदायक ठरू लागले आहे. प्राथमिक अवस्थेतच याचा त्रास होत असेल, तर कीगल व्यायाम उपयुक्त ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
वाढत्या वयात मूत्रमार्गाविषयीच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. यामध्ये काहींना लघवीवरील नियंत्रण जाणे किंवा लघवीला वारंवार जावे लागणे, अशा समस्या उद्भवतात. मात्र संकोच वाटल्याने रुग्ण डॉक्टरांकडे जाणे टाळतात. अनेकवेळा नेमक्या कोणत्या तज्ज्ञांकडे जावे, याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक उपचार करूनही समस्या पाठ सोडत नाही. अशावेळी अनेक लोक हा आजार अंगावर काढत राहतात. मात्र, हा आजार खूप काळ अंगावर काढल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यताही असते आणि ती गंभीर रूप धारण करू शकते.
पेल्विक अर्थात ओटीपोट फ्लोरमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यास आणि पेल्विक मांसपेशींमधली ताकद कमी झाल्यावर कीगर एक्सरसाईज करण्याचा सल्ला दिला जातो. हा व्यायाम प्रकार कुठेही करता येतो. बसून, झोपून आणि उभे राहून करता येतो. वैद्यकीयतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य मांसपेशींमध्ये तणाव निर्माण करता आला, तर आजाराच्या पहिल्या टप्प्यात याचा फायदा होतो.
लक्षणे कोणती?
वारंवार लघवीस जावे लागणे
लघवीला जोर द्यावा लागणे
लघवी शिल्लक राहणे
रात्री वारंवार उठावे लागणे
हसल्यास, खोकल्यास न कळत लघवी होणे
लघवीस जळजळ होणे.
थंडी, ताप येणे
लघवीमध्ये रक्त जाणे
पुरुषांमधील कारणे
ही लक्षणे प्रोस्टेट ग्रंथीमुळे असू शकतात.
लघवी मार्गामध्ये किडनी किंवा मुत्राशयामध्ये गाठ असल्यास किंवा जंतुसंसर्ग असल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो.
वयाच्या पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथीची वाढ, प्रोस्टेटचा कॅन्सर अथवा जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो.
स्त्रियांमधील कारणे
मेनोपॉजनंतर हार्मोन्सचे प्रमाण कमी झाल्याने जननेंद्रियांचे स्नायू शिथिल होतात.
प्रसूतीनंतर या स्नायूंमध्ये शिथिलता येते तसेच स्थूलतेमुळे स्नायूंमधील क्षमता कमी झाल्याने हा आजार होऊ शकतो.
कोट : (हाफ कॉलम फोटो आहे)
मूत्रमार्गावरील स्नायूंवर नियंत्रण ठेवण्याच्या व्यायामाची पद्धत प्रचलित आहे, त्याला कीगल व्यायाम पद्धती म्हणतात. याचा मूत्राशयाजवळचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयोग होतो. हे स्नायू बळकट झाल्याने वृद्ध व्यक्तींना लघवीवर संयम राखणे सोपे जाते. त्यात मूत्रमार्गावरील नियंत्रण जाण्याचा संदेश ओळखून मूत्रमार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या व्यायामाची मदत होते. मात्र ही पद्धती औषधोपचारांसह वापरली जाते.
- डॉ. संतोष जाधव, मूत्रविकार तज्ज्ञ, सातारा
तपासण्या कोणत्या?
लघवीची तपासणी :
जंतुसंसर्ग आहे की नाही, हे पाहण्यासाठी लघवीची तपासणी करणे.
रक्ताची तपासणी :
किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी करता येते व प्रोस्टेट कॅन्सरसाठी ढरअ ही तपासणी करता येते.
सोनोग्राफी :
लघवीच्या इंद्रियांची सोनोग्राफी करणे.
युरोडायनामिक्स स्टडी :
‘युरोडायनामिक्स’ या यंत्राद्वारे मज्जातंतूच्या नियंत्रणाबाबत व मूत्राशयाच्या दाबाबाबत तपासणी करणे.
दुर्बिद्णीवारे मूत्राशयाची तपासणी करणे.
हे टाळाच...!
पाणी, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, सॉफ्टड्रिंक्स कमी करणे
प्रोस्टेट ग्रंथीच्या लक्षणांसाठी औषधोपचार (अल्फा ब्लॉकरस्)
प्रोस्टेट ग्रंथीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
स्त्रियांमध्ये न कळत होणाऱ्या समस्येसाठी औषधोपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.