Unique awakening of drought relief from Kirtana | कीर्तनातून दुष्काळ निवारणाचे अनोखे प्रबोधन
कीर्तनातून दुष्काळ निवारणाचे अनोखे प्रबोधन

ठळक मुद्देभोसले महाराजांचा उपक्रम : माण तालुक्यातही छावणीवर कीर्तन सेवेला सर्व स्तरातून मिळतोय प्रतिसाद

दहिवडी : महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन काळात संतांनी समाजप्रबोधनाचे काम केले. संतांचे माहेरघर असलेला महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या जंजाळ्यात अडकलाय. शेतकरी पूर्णपणे खंगला आहे. दुष्काळाचे सावट दूर व्हावे, गावे पाणीदार व्हावी, भरपूर शेतउत्पन्न व्हावं याकरिता अनेक संघटना कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे संतसाहित्याच्या आधारे लोकांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

काम महाएनजीओ फेडरेशन आणि वारकरी संप्रदाय युवा मंच यांनीही सुरू केले आहे. वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक अक्षय महाराज भोसले यांच्या विचारांतून या उपक्रमाला चालना मिळाली आहे. महाराजाच्या गावात कधीच पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे या गावातील दुष्काळ माझ्या जन्मापासूनच अनुभवला आहे. वृक्ष आणि जलसंवर्धन होत नाही, तोवर दुष्काळ महाराष्ट्रातून जाणार नाही, असं अभ्यासाअंती सिद्ध झालं. कीर्तनाचे धडे ज्यांच्याकडे गिरवले त्या श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर व श्रीगुरू प्रमोदमहाराज जगताप यांनी याविषयी जाणीव करून देण्यात आलीे.

दरम्यान, पाणी फाउंडेशनचं काम उभं राहिलं. या कामाचं यशही पाहिलं. म्हणूनच आपल्याला जमेल त्या पद्धतीने वृक्ष, जलसंवर्धनाचे प्रबोधन करायचे ठरवले. राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, आर्ट आॅफ लिव्हिंगचे महाराष्ट्रचे सल्लागार शेखर मुंदडा यांचीही भेट घडून आली. दोघांचेही या क्षेत्रातील काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

समाजप्रबोधनाचं काम महाराष्ट्रात सुरू
सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज या संदर्भातील अभ्यासपूर्ण पोस्ट्स जवळपास १०,००० हून अधिक लोकांपर्यंत नियमित पोहोचल्या जातात. आतापर्यंत सोलापूर, सातारा, बीडमधील ३० हून अधिक छावण्यापर्यंत व बिजवडी, राजवडी, अनभुलेवाडी, मोगराळे, पाचवड, वावरहिरे येथे समाजप्रबोधनाचं काम झाल्याचं अक्षय महाराज यांनी सांगितले. या संत वचनाप्रमाणे आपणही जलाशयाची निर्मिती केली असती, विविध प्रकारची महावने लावली असती तर दुष्काळाचे संकट ओढवले नसते. संतसाहित्याचा जनमाणसांत हवा तेव्हा प्रसार न झाल्यानेच ही परिस्थितीत ओढावल्याची खंत त्यांनी व्यक्त करतात.

हा उपक्रम अत्यंत गरजेचे आहे. यामधून मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांत जागृती निर्माण होत आहे.
- आप्पा कोरे, ग्रामस्थ, सातारा

सध्या महाराष्ट्रसह माण तालुका दुष्काळाच्या खाईत अडकला आहे. त्याठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आला असून, यामध्ये दुष्काळावर कीर्तन करणे हे समाज हिताचे आहे.
- श्वेता जंगम, ग्रामस्थ, सातारा


Web Title: Unique awakening of drought relief from Kirtana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.