उंब्रज ग्रामपंचायत तरुणांच्या हाती!
By Admin | Updated: November 5, 2015 00:12 IST2015-11-04T21:47:56+5:302015-11-05T00:12:28+5:30
विरोधकांनीही दाखविली ताकद : भावकीच्या राजकारणाचीही पहायला मिळाली चुनूक

उंब्रज ग्रामपंचायत तरुणांच्या हाती!
अजय जाधव -- उंब्रज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाबरोबर येथे भावकीचेही राजकारण, समीकरण दिसून आलेच; त्याचबरोबर सर्वच पॅनेलमध्ये बहुतांशी उमेदवार हे तरुण व नवीन चेहरे दिले गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उंब्रज विकास आघाडीने १० जागा जिंकून बहुमत मिळविले. तर विरोधातील भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ७ जागा मिळवून आपलीही ताकद दाखवून दिली.
ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षीय चिन्हावर लढली जात नाही. त्याचबरोबर ही निवडणूक समविचारी लोक व बेरजेचे राजकारण करून लढली जाते. यामुळे अनेकवेळा एकाच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकाविरुद्धतही लढतात. तर एकत्र येऊन तिसऱ्या विरोधातही लढतात. अशाच पद्धतीने उंब्रज ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उंब्रज विकास आघाडीचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, सह्याद्रीचे संचालक हंबीरराव पाटील, पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, सह्याद्रीचे संचालक डी. बी. जाधव यांनी केले. त्याचबरोबर काँग्रेसचे जयंत जाधव यांनीही या पॅनेलमधून आपले २ उमेदवार उभे केले व निवडून आले.
याच बरोबर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष महेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, माजी उपसरपंच अशोक जाधव, धैर्यशील कदमांचे समर्थक विकास जाधव, विलास आटोळे, तात्या जाधव यांनी केले. निवडणुकीचे रणांगण हे अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून तयार झाले. अर्ज भरणे, काढणे यावरील चर्चेतून उमेदवाराचा प्रचार सुरू झाला. अनेकजणांनी अर्ज भरले, काहींचे अर्ज राहिले काहींनी काढले, काहींना काढण्यास भाग पाडले, आणि यात जे रुसवे, फुगवे झाले त्यांचे फटके काहींच्या विजय सुकर करून गेले. तर काहींना पराभवाला सामोरे जावे लागले.
या दोन पॅनेलबरोबर भैरवनाथ जनता विकास आघाडी जनशक्ती ग्रामविकास पॅनेल हे दोन पॅनेल व अपक्षही निवडणुकीत उभे होते. अनेक ठिकाणची विजयाची समीकरणे या दोन पॅनेलमधील उमेदवार व अपक्ष यांनी बदलली आहेत. मताची विभागणीने काहींना विजय मिळवून दिला तर काहींना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत बहुतांशी उमेदवारांनी लाखोंचा चुराडा केला. त्यातील काही विजयी झाले, पराभूतही झाले. परंतु यानंतर निवडणुकीला सर्वसामान्य कोण उभा राहू शकणार नाही. अशी चर्चा लोकांच्यात आहे. मत मिळवणे हा उद्देश ठेवूनच प्रचारयंत्रणा काम करत असल्यामुळे विकासाचे मुद्दे भावी काळातील गावाच्या विकासाच्या योजना यावर चर्चाच झाली नाही. निवडून येणे हाच दृष्टिकोन ठेवून उमेदवारांनी मतदारराजाला वेगवेगळी आमिषे दाखवून मते मिळवण्याचे प्रयत्न झाले.
सद्यस्थितीला १७ जण उंब्रज ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. या सदस्यांनी विविध विकासकामे उंब्रजमध्ये खेचून आणण्यासाठी एकत्रित काम करावे व पुढील पाच वर्षांत आदर्शगाव निर्माण करावे. ऐवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे.
काहींचा निसटता विजय
येथील वार्ड क्र. ४ मधील जयवंत जाधव हे ३२६ मतांच्या फरकाने विजयी झाले. तर वार्ड क्र. २ मधील रवींद्र जाधव हे दहा मताने विजयी झाले तर वार्ड क्र. ३ मधील मंगल पवार या ११ मतांनी विजयी झाल्या.