उदयनराजे तुम्हीच टीमचे मालक; कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठरवा, पण..; देवेंद्र फडणवीसांची मिश्कील टिप्पणी
By प्रमोद सुकरे | Updated: January 17, 2024 16:31 IST2024-01-17T16:28:59+5:302024-01-17T16:31:23+5:30
मुंबईत अनेक रेडे मोकाट

उदयनराजे तुम्हीच टीमचे मालक; कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठरवा, पण..; देवेंद्र फडणवीसांची मिश्कील टिप्पणी
कराड: उदयनराजे तुम्हीच आयपीएल टीमचे मालक आहात. त्यामुळे टीम मध्ये कोणाला ठेवायचं कोणाला ठेवायचं नाही हे तुम्हीच ठरवा अशी फटकेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडात केली. उपस्थितांनी ही त्याला चांगलीच दाद दिली. पण सातारच्या लोकसभेच्या मैदानात उदयनराजेच पुन्हा याचीही चर्चा सभास्थळी सुरु झाली.
कराड येथे दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कृष्णा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते .भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, रामकृष्ण वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. अतुल भोसले यांनी कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा नव्याने आराखडा करण्याची मागणी केली. या मागणीला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंनीही दुजोरा दिला. रणजीचे सामने व्हावेत असे स्टेडियम बनवा असे ते फडणवीस यांना म्हणाले. तर व्यासपीठावर रणजीत खेळण्यासारखे अनेक खेळाडू आहेत. पण मलाही तेवढे त्या टीम मध्ये ठेवा असे मिश्कीलपणे त्यांनी टिप्पणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उदयनराजे ही रणजीची नव्हे तर आयपीएलची टीम आहे. या टीमचे मालक तुम्ही आहात. आणि टीम मध्ये कोणाला ठेवायचं? कोणाला ठेवायचं नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे असं म्हणताच टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्याला प्रतिसाद दिला. यावेळी लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसलेच पुन्हा उमेदवार असल्याची चर्चा उपस्थितांच्यात रंगून गेली.
मुंबईत अनेक रेडे मोकाट
देवेंद्र फडणीस आपल्या भाषणात म्हणाले, कृषी क्षेत्राला विज्ञानाची जोड देणारे हे प्रदर्शन आहे .येथे देश विदेशातील तज्ञ आले आहेत. त्यांचे परिसंवाद होणार आहेत. तसेच देशातील सर्वात मोठा बैल इथं आला आहे. आणि त्याबरोबर यांत्रिक बैलही आले आहेत. पण आमच्याकडे मुंबईत रेडे मोकाट झाले आहेत. मीडियासमोर दररोज येऊन काहीही बोलत राहतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे काही तंत्रज्ञान असेल तर आम्हाला सांगा असा नाव न घेता त्यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. आणि उपस्थितांच्यात एकच हशा पिकला.
आघाडी नव्हे महायुतीच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले आत्ताच बोलताना त्यांच्या तोंडातून चुकून महाविकास आघाडी हा शब्दप्रयोग झाला. माध्यमांची लोक बरोबर त्यावरच बोट ठेवतील, असे म्हणत आमची महायुतीच आहे असे सांगताच उपस्थितांनी त्यालाही दाद दिली.