शेतात जाऊन उदयनराजेंनी केली पेरणी

By Admin | Updated: June 14, 2016 00:23 IST2016-06-13T21:38:05+5:302016-06-14T00:23:56+5:30

कुरी धरून हाकले ‘सर्जा-राजा’ : राजेंच्या या पैलूचीही चर्चा

Udayan Rajen went to the farm and sown it | शेतात जाऊन उदयनराजेंनी केली पेरणी

शेतात जाऊन उदयनराजेंनी केली पेरणी

सातारा : यंदाच्या मोसमी पावसात तरी पावसाने बळीराजाला धीर द्यावा म्हणून दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनीच प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीचा शुभारंभ केला. परळी खोऱ्यातील अंबवडे खुर्द मानेवाडी येथे त्यांनी स्वत:च औत हातात धरल्याने शेतकरी वर्गामध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले.
खासदार उदयनराजे भोसले हे कधी काय करतील, याचा अंदाज भल्या भल्यांना आलेला नाही. अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतलेल्या उदयनराजेंना कोणत्याही क्षेत्राचे वावडे नाही, हे त्यांनी यापूर्वीही अनेकदा सिध्द केले आहे. रविवारी अनाहुतपणे घडलेल्या प्रसंगाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
उदयनराजे एका भूमिपूजन समारंभासाठी अंबवडे खुर्द मानेवाडी येथे आले होते. भूमिपूजन समारंभ पार पडल्यावर तेथून परत जाताना एका शेताजवळ पेरणीसाठी औत धरण्याची तयारी सुरू होती, हे पाहताच उदयनराजेंनी त्यांची गाडी थांबवण्याचा इशारा केला. त्याबरोबर त्यांच्या गाडीसह इतर गाड्यांचा ताफाही थांबला. खासदार उदयनराजे भोसले हे थेट गाडीतून उतरून पायवाटेने पाभार (कुरी) धरण्याची तयारी सुरू असलेल्या शेतात गेले. तेथील औताची तयारी कशी चालू आहे, याचे त्यांनी काही वेळ निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी स्वत: औत घेऊन बैलांना जोडून पेरणीच्या कामास सुरुवात केली. उदयनराजेंनी स्वत: हातात धान्याची मूठ धरल्याचे पाहताच शिवारातील नागरिकही उत्सुकतेने घटनास्थळी आले. राजेंच्या या पवित्र्याने सारेच अचंबित झाले. औत कसे धरायचे, हाकारा कसा करायचा, याची असलेली परिपूर्ण माहिती पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भिकूभाऊ भोसले, माजी पंचायत समिती सदस्य संजय भंडारे, भूमाताचे जिल्हाध्यक्ष धर्मराज जगदाळे, अशोक सावंत, अनिल निकम आदींसह बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

शेतात जाऊन प्रत्यक्ष कुरीवर मूठ धरत खासदार उदयनराजेंनी चक्क पेरणी केली. त्यावेळी रवी साळुंखे, सुनील काटकर, भिकूभाऊ भोसले, संजय भंडारे, धर्मराज जगदाळे, अशोक सावंत, अनिल निकम उपस्थित होते.

Web Title: Udayan Rajen went to the farm and sown it