नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू
By Admin | Updated: April 6, 2015 01:30 IST2015-04-06T01:28:23+5:302015-04-06T01:30:12+5:30
हरिपुरातील घटना : दोघे बचावले; मृत राजस्थानचे

नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमातील पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला, तर दोघेजण प्रसंगावधान राखून पात्राबाहेर आल्याने बचावले. मिट्टू नंदकिशोर दानका (वय २३) व राजेंद्रकुमार पप्पू वर्मा (१७, दोघे रा. राजस्थान, सध्या रा. इस्लामपूर) अशी मृतांची नावे आहेत. आज, रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. राजकुमार नंदकिशोर दानका (२४) व मोनू हनुमानदास दानका (२१, राजस्थान, सध्या रा. बोंद्रे वाडा, हरिपूर) हे दोघे बचावले आहेत.
मिट्टू दानका व राजेंद्रकुमार वर्मा इस्लामपुरात भाड्याने खोली घेऊन राहात होते. ते फरशी बसविण्याचे काम करीत होते. मिट्टूचा सख्खा भाऊ राजकुमार व नातेवाईक मोनू दानका हे हरिपुरात राहतात. आज दुपारी हे चौघेही एकत्रित बसून जेवले. त्यानंतर दीड वाजता ते अंघोळ करण्यासाठी कृष्णा-वारणा संगमावर गेले होते. चौघांनाही पोहता येत नव्हते. मिट्टू व राजेंद्रकुमार पाण्याचा अंदाज घेत काठापासून जवळपास दहा फूट अंतरावर पाण्यात गेले. याठिकाणी वाळू उपशामुळे मोठा खड्डा पडला होता. याचा त्यांना अंदाज आला नाही. या खड्ड्यात मिट्टू आणि राजेंद्रचा पाय गेल्याने ते पाण्यात बुडू लागले. हा प्रकार पाहून पाठीमागे नदीकाठाजवळ अंघोळ करणाऱ्या राजकुमार व मोनू यांनी आरडाओरड केली. प्रसंगावधान राखून भीतीने ते नदीतून बाहेर आले. दरम्यान, नदीच्या काठावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघेही बुडाले होते. या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस, महापालिका अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. दुपारी अडीचपासून दोघांचा शोध सुरु होता. सायंकाळी साडेपाचला दोघांचे मृतदेह सापडले. (प्रतिनिधी)