महाबळेश्वरला भरधाव कारची दोन वाहनांना धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 15:10 IST2018-05-21T15:10:54+5:302018-05-21T15:10:54+5:30
पाचगणीहून महाबळेश्वरकडे निघालेल्या पर्यटकाच्या भरधाव कारने दोन कारला धडक दिली.

महाबळेश्वरला भरधाव कारची दोन वाहनांना धडक
महाबळेश्वर (सातारा) : पाचगणीहून महाबळेश्वरकडे निघालेल्या पर्यटकाच्या भरधाव कारने दोन कारला धडक दिली. यामध्ये तिन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. हा अपघात महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर मेतगुटाड हद्दीत सोमवारी दुपारी झाला. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली.
याबाबत माहिती अशी की, उन्हाळी व रविवारच्या सुटीमुळे महाबळेश्र्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे काही पर्यटक परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यातच पाचगणीहून महाबळेश्वरकडे कार (एमएच ०५ बीएल ६००९) ने समोरून येत असलेली कार (जीजे ०१ एचयू ९७९५) ला जोरदार धडक दिली. यामध्ये ती कार रस्त्यावर पलटी झाली. त्यानंतर तिसरी कार (एमएच १४ डी ऐन ३७९२) लाही धडक दिली. यामध्ये एका महिलेला किरकोळ दुखापत झाली. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. तीन वाहनांच्या विचित्र अपघातामुळे महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.