जोशी विहीर येथे कार-दुचाकी अपघातात दोघेजण ठार
By नितीन काळेल | Updated: April 18, 2024 22:12 IST2024-04-18T21:56:11+5:302024-04-18T22:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील जोशी विहीर, ता. वाई येथे कार-दुचाकीच्या अपघातात दोघेजण ठार झाले. हा ...

जोशी विहीर येथे कार-दुचाकी अपघातात दोघेजण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील जोशी विहीर, ता. वाई येथे कार-दुचाकीच्या अपघातात दोघेजण ठार झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला. मृतातील एकजण सातारा येथील तर दुसरा सांगली जिल्ह्यातील आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातात दुचाकीवरील मंदार रामचंद्र कोल्हटकर (वय ४४, रा. कोल्हटकर आळी सातारा), आणि धीरज बाळासो पाटील ( वय ३७, रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोशी विहीरजवळ झाला. मृत दोघे दुचाकीवरून सातारा बाजूकडे येत होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की यामध्ये दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दोघांनाही सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चाैकीत नोंद झाली आहे.