शपथविधीसाठी दोघे वृद्ध शेतकरी दुचाकीवरून मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:52 IST2019-11-29T23:52:43+5:302019-11-29T23:52:55+5:30
शंकर पोळ । कोपर्डे हवेली : गत आठवड्यापासून सतत घडत असलेल्या राजकीय घडामोडी हा ग्रामीण विभागातील ग्रामस्थांचा चर्चेचा विषय ...

मोहनराव चव्हाण आणि डॉ. दस्तगीर सुतार
शंकर पोळ ।
कोपर्डे हवेली : गत आठवड्यापासून सतत घडत असलेल्या राजकीय घडामोडी हा ग्रामीण विभागातील ग्रामस्थांचा चर्चेचा विषय ठरला होता. अखेर सरकार स्थापन होऊन गुरुवारी हा शपथविधी मुंबई येथील शिवतीर्थावर संपन्न झाला. त्यासाठी कोपर्डे हवेली येथील वृद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहनराव चव्हाण आणि डॉ. दस्तगीर सुतार हे चक्क दुचाकीवरून मुंबईला गेले. शपथविधी सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली.
कोपर्डे हवेलीतील सिद्धनाथ मंदिरासमोरची गुरुवारची सकाळची वेळ. त्याठिकाणी गप्पा मारत बसलेल्या ग्रामस्थांमध्ये शपथविधी सोहळ्याची चर्चा सुरू होती. रंगलेल्या चर्चेत मोहनराव चव्हाण, डॉ. दस्तगीर सुतार हे दोघेही सहभागी झाले. कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, श्रीकांत पाटील, अप्पासाहेब चव्हाण आदींसह इतर ग्रामस्थही त्याठिकाणी होते.
सामजिक कार्यकर्ते मोहनराव चव्हाण व डॉ. दस्तगीर सुतार या दोघांचेही वय ७० वर्ष आहे. तसेच हे दोघेही वर्गमित्र आहेत. त्यांचे वय पाहता इतरांनी त्यांना दुचाकीवरून जाण्यापेक्षा इतर वाहनांनी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याला नकार देत मोहनराव चव्हाण म्हणाले, ‘आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे आहोत. आम्ही या वयातही दुचाकीवरून जाणारच.’ ग्रामस्थांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण कोणाचेही न ऐकता मोहनराव चव्हाण आणि डॉ. दस्तगीर सुतार हे मुंबईला दुचाकीवरून रवाना झाली. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोपर्डे हवेलीतून दुचाकीवरून त्यांचा सुरू झालेला हा प्रवास रात्री साडेसात वाजता शपथविधी सोहळ्यापर्यंत जाऊन पोहोचला.