Satara: गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, महाबळेश्वरनजीकची घटना
By दीपक शिंदे | Updated: December 28, 2023 19:26 IST2023-12-28T19:23:15+5:302023-12-28T19:26:19+5:30
महाबळेश्वरच्या जंगलात गव्याचे प्रमाण वाढले

Satara: गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, महाबळेश्वरनजीकची घटना
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले मांघर या ठिकाणी गव्याच्या केलेल्या हल्ल्यात दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवार, दि. २८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पोलिस पाटील योगेश गणपत पार्टे, गंगाराम पार्टे असे जखमींचे आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरहून तापोळा एसटीमधून आलेले दोघेजण गुरुवारी सायंकाळी मांघर बस थांब्यावर उतरून पायी मांघर गावाकडे निघाले होते. ते काही अंतर चालून गेल्यावर एक गवा रस्ता ओलांडून जात होता. जंगलातून येऊन अचानक गव्याने मांघरचे पोलिस पाटील योगेश गणपत पार्टे (वय ३९) व गंगाराम पार्टे (४८, दोघे रा. मांघर) याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वाटसरू गंगाराम पार्टे पळून जाण्यास यशस्वी झाले. परंतु मांघरचे पोलिस पाटील एका पायाने अपंग असल्याने त्यांना पळता आले नाही. त्यामुळे ते अधिक जखमी झाले.
यावेळी मांघर गावातील स्थानिक नागरिकांनी योगेश पार्टे यांना प्रथम उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हाताला व बरगडीला दुखापत झालेली दिसून आली. अधिक उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाबळेश्वरच्या जंगलात गव्याचे प्रमाण जास्त वाढले असून यामध्ये गव्याचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.