एसटी बसच्या धडकेने दोन चुलत भाऊ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:23 IST2018-06-23T00:23:06+5:302018-06-23T00:23:20+5:30
भाटमरळी येथे एका पाहुण्याकडे जेवण करून परतणाऱ्या दोन चुलत भावंडाच्या दुचाकीला जरंडेश्वर नाका परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एसटीने धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

एसटी बसच्या धडकेने दोन चुलत भाऊ ठार
सातारा : भाटमरळी येथे एका पाहुण्याकडे जेवण करून परतणाऱ्या दोन चुलत भावंडाच्या दुचाकीला जरंडेश्वर नाका परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एसटीने धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हणमंत अनंत शिंदे (३८), नागेश गुलाब शिंदे (५० दोघे रा. वडूथ ता. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विजापूर- सातारा ही एसटी बस (एम एच १४ ए क्यू ४६५८) वाढे फाट्यावरून साताऱ्याकडे येत होती. यावेळी हणमंत व नागेश हे भाटमरळी येथे एका पाहुण्याकडे जेवण करून दुचाकीवर (एम एच ११ बी टी ४६५८) येत होते.
सदर बझारमार्गे येत असताना जरंडेश्वर नाका परिसरात बस व दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात दुचाकी एसटीच्या खाली गेल्याने दोघे गंभीर जखमी झाले. दुचाकीचा चक्काचूर झाला. त्यानंतर दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारापूर्वी दोघांचा मृत्यू झाला. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.