पाचवडचे बारा विद्यार्थी हाँगकाँगसाठी सज्ज
By Admin | Updated: January 20, 2015 00:00 IST2015-01-19T22:46:24+5:302015-01-20T00:00:57+5:30
‘तिरंगा’ शाळेच्या विद्यार्थ्यांची बँकॉकनंतर आता नवी भरारी

पाचवडचे बारा विद्यार्थी हाँगकाँगसाठी सज्ज
भुर्इंज : थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविल्यानंतर पाचवड, ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आता हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षीही आंतरराष्ट्रीय भरारी कौतुकाचा विषय ठरली आहे. ‘नो डोनेशन’ या तत्त्वावर चालविल्या जाणाऱ्या तिरंगा इंग्लिश स्कूलने शिक्षणासोबत विविध स्पर्धांमध्ये नेहमीच एक पाऊल ठेवले आहे. चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या शाळेच्या तब्बल बारा विद्यार्थ्यांनी विजयी पताका फडकावली आहे. विशेष म्हणजे, या शाळेची विद्यार्थिनी सिद्धी गायकवाड ही तर ‘चॅम्पियन’ ठरली असून, तन्मय कुंभार याने पहिला ऋषीकेश दीपक शिंदे याने दुसरा, आयुष शरद नवले, आदित्य निकम यांनी तिसरा, कुणाल राजेंद्र बाबर, तृप्ती जाधव, करण शेवाळे यांनी चौथा तर सुहान आसिफ शेख, गिरिराज पवार, पारस शिंदे, श्रृती सोनावले यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांची हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थी कसून तयारीला लागले आहेत. अॅबॅकस शिक्षिका सुनीता पाडळे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. दरम्यान, संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, सचिव जयवंत पवार, प्राचार्य वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी चेन्नई येथील यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)