जखिणवाडीला चार वर्षांत बारा पारितोषिके स्वच्छतेत सातत्य : राज्य स्पर्धेत धडक
By Admin | Updated: November 23, 2014 23:44 IST2014-11-23T21:43:22+5:302014-11-23T23:44:29+5:30
‘स्वच्छ भारत’ अभियान उत्स्फूर्तपणे

जखिणवाडीला चार वर्षांत बारा पारितोषिके स्वच्छतेत सातत्य : राज्य स्पर्धेत धडक
मलकापूर : जखिणवाडी ग्रामस्थांनी महिन्यातील पहिला मंगळवार गावच्या स्वच्छतेसाठी हा अभिनव उपक्रम गेली चार वर्षे सुरू आहे़ स्वच्छतेबाबत सातत्य राखल्यानेच शासनाचे बारा पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत़ तालुक्यातील इतर गावांसाठी त्यांचा उपक्रम प्रेरणादायी आहे़ जखिणवाडी, ता़ कऱ्हाड येथे चार वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी सरपंच नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या हाती गावाचा कारभार सोपविला़ सदस्यांनी गावात एक-एक करत नवनवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली़ गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणून स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत घेण्यात आला़ त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी दर महिन्यातील पहिला मंगळवार गावाच्या स्वच्छतेसाठी देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी संमती दिली़ हा अभिनव उपक्रम गेली चार वर्षे सुरू आहे़ (प्रतिनिधी)
राज्य शासनाची तब्बल बारा पारितोषिके जखिणवाडीने पटकावली आहेत़ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला, तर विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावित राज्यस्तरीय स्वच्छता अभियान स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला आहे़
यशाची शिखरे गाठणाऱ्या गावाचा आदर्श राज्यातील इतर गावांनी घ्यावा़ यासाठी शसनाच्या वतीने जखिणवाडीचा मॉडेल म्हणून उपयोग केला जात आहे़ (प्रतिनिधी)
जखिणवाडीला डझनभर पुरस्कार
जखिणवाडी गावाने २००९-१० वर्षात ‘निर्मलग्राम’, २०१०-११ या वर्षात सदाशिव खांडके यांना ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार, २०११-१२ या वर्षात ‘पर्यावरण समृद्ध गाव’, संत गाडगबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम, दिवंगत वसंतराव नाईक पाणी व ‘सांडपाणी व्यवस्थापन’ पुरस्कार व यशवंत पंचायत राज तालुक्यात प्रथम हे पाच पुरस्कार, २०१२-१३ यावर्षी गौरव ग्रामसभेस मानांकन व विकासरत्न पुरस्कार, २०१३-१४ वर्षात संतत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम व पुणे विभागात द्वितीय दोन पुरस्कार तर २०१४-१५ या वर्षात यशवंत पंचायत राज जिल्ह्यात प्रथम क्रमांक असे बारा पुरस्कार मिळवले़
‘स्वच्छ भारत’ अभियान उत्स्फूर्तपणे
जखिणवाडी गावातील ‘स्वच्छ भारत’ अभियानात प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, अविनाश फडतरे, सदाशिव खांडके, चंद्रकांत पारवे, नागेश निकम, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच पांडुरंग कणसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादाराम पाटील, मारुती नलावडे यांच्यासह सर्वांनी सहभाग घेतला़