थकबाकीदारांची नळकनेक्शन तोडली
By Admin | Updated: January 3, 2015 00:01 IST2015-01-02T22:37:10+5:302015-01-03T00:01:16+5:30
पुसेगावात कारवाई : दीड लाख रुपयांची थकबाकी वसूल; बारा पथकांद्वारे इतर गावांतही प्रक्रिया राबविणार : भोसले

थकबाकीदारांची नळकनेक्शन तोडली
पुसेगाव : पुसेगाव ग्रामपंचायत थकित कर वसुलीसाठी नळकनेक्शन तोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) पहिल्या दिवशी दीड लाखाची थकाबाकी वसूल झाली.
थकित कर न भरणाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू झाली आहे. तालुक्यातील इतर गावांतही अशीच प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती वडूज पंचायत समितीचे भागविस्तार अधिकारी बी. बी. भोसले यांनी दिली.
गटविकास अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकित कर वसुलीसाठी वडूज पंचायत समितीच्या वतीने बारा करवसुली पथके तयार केली असून, त्याबाबत धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तालुक्यात एका पथकात पाच ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांचा समावेश असलेली बारा पथके तयार करण्यात आली आहेत. पुसेगावात थकाबाकीदारांची नळकनेक्शन तोडण्याच्या कारवाईत अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. गावातील थकित खातेदारांच्या याद्या तयार करून ग्रामपंचायत कार्यालयात नोटीस बोर्र्डावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देत वेळेत कर भरणा केला आहे. मात्र. बऱ्याच लोकांकडून अद्यापही या मोहिमेकडे दुर्लक्ष होत आहे.
घरोघरी जाऊन ग्रामपंचायतीचे कर्मचारी थकित रक्कम भरण्यास विनवणी करत आहेत. परंतु अनेक जणांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामसभेत ठराव करून संबंधित खातेदारांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
थकबाकीदारांची नावे आता फ्लेक्सवर
गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावातून फिरत्या रिक्षाद्वारे लोकांच्यात जनजागृती करण्यात आली. पहिल्या टप्प्यात नागरिकांना कर मागणी बिल व रीट बिल देण्यात आली आहे. तसेच कर भरणा करण्याविषयी त्यांना पोस्टाद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच या नागरिकांना ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारी प्रत्येक सुविधा नाकारण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधितांना देण्यात आलेली नळकनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे, जप्ती आदेश देण्यात येणार आहे. थकबाकीदाराने वेळीच भरणा न केल्यास वर्दळीच्या ठिकाणी, गावातील चौकात तसेच रहदारीच्या रस्त्यावर डिजिटल फ्लेक्स बोर्डावर त्या थकित बाकीदारांची नावे झळकवण्यात येणार आहेत.