कळकरायच्या सुळक्यावर फडकला तिरंगा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST2021-04-09T04:41:00+5:302021-04-09T04:41:00+5:30
सातारा : उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला ९० अंशांतील सरळ सुळका. क्षणात धडकी भरावी ...

कळकरायच्या सुळक्यावर फडकला तिरंगा...
सातारा : उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला ९० अंशांतील सरळ सुळका. क्षणात धडकी भरावी अशी ती जागा. ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्थित बुलंद असा किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस एक सुळका आहे या सुळक्यास कळकरायचा सुळका असे म्हणतात. हा सुळका शिलेदार अडव्हेंचर टीमने यशस्वीपणे सर करून छ्त्तीसगढ येथे नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी वीरमरण आलेल्या शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली वाहिली.
या सुळक्याची उंची १८० फूट आहे. साधारण ही जागा पाहूनच जिथे सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो, तिथे या कळकरायचा सुळक्याची चढाई करणे याची कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. मात्र हे धाडस कुणी करणार नाही ते गिर्यारोहक रोहित जाधव आणि त्यांचे सहकारी आशिष मगरे यांनी हे एकप्रकारे आव्हान स्वीकारले. सकाळी ८ वाजता जांभिवली या गावापासून ढाक बहिरी या किल्ल्याकडे जाण्यास सुरुवात केली आणि पायथ्याशी ९ वाजता ते पोहोचले. ढाक किल्ल्याची भटकंती करून कळकरायचा सुळक्याच्या पायथ्याशी १२ वाजता पोहोचल्यानंतर मोहिमेची पूर्ण तयारी करीत बारा वाजता चढाई करण्यास सुरुवात झाली. साधारणतः एक ते दीड तासात मोठ्या आत्मविश्वासाने व जिद्दीने सर्व सुरक्षा साधनांचा, रोपचा वापर करीत यशस्वीपणे चढाई करीत सुळक्यावर शिलेदारांनी पाय ठेवताच हातात तिरंगा फडकवत राष्ट्रगीत म्हटले. तसेच छ्त्तीसगढ येथे नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि ही मोहीम आपल्या भारतीय जवानांना समर्पित केली.
चढाई करतांनाचे आलेले अनुभव सांगताना सुळक्यावर असणारी निसरडी गवताळ पाउलवाट, समोर थेट डोक्यावर 90 अंशांतील सरळ उभी अतिकठीण चढाई तर सुळक्याच्या बाजूला असणारी खोल दरी सगळंच थरारक होतं. सुळक्यावर चढाई करताना इकडचा पाय तिकडे जरी पडला तर थेट खोल दरीच्या जबड्यात विश्रांती. चढाई करताना एक एक करून दोर पकडून पुढे चालू लागलो, पहिला कातळ चढून पुढे गेलो, फक्त उभा राहण्याइतकी जागा होती, दुसरा टप्पा अगदी आनंदात चढून वरती गेलो आता इथून पुढे कस लागणार होती. "कळकरायचा सुळका" चढाई करताना तिसऱ्या ठिकाणी " एक ट्रॅव्हल्स चढाई लागते, ती चढाई करताना जीव मुठीत घेऊन जावं लागत. या ठिकाणी जर काही चूक झाली तर सरळ आपण दरीत कोसळणार यात काही शंका नाही. जीवाला धोकादायक ठरणारी ही मोहीम आहे. मात्र शिलेदार ॲडव्हेंचर टीम च्या साथीने शेवटी अशक्य ते शक्य करून दाखवले आहे.
गिर्यारोहक रोहित जाधव यांनी शिलेदार टीमचे सेनापती सागर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते केली. तसेच राकेश यादव, विनायक, ऋषी, सोपान, राज , कविता, अमिता, माधवी पवार यांची साथ सुळक्यावर यशस्वीपणे चढाई करण्यासाठी मोलाची ठरली. रोहितने यापूर्वी सह्याद्री डोंगररांगामधील अतिकठीण श्रेणीतील गडकिल्ले व अनेक सुळके यशस्वीपणे सर केले आहेत. तसेच १२ जानेवारी २०२१ रोजी नाशिक जिल्ह्यातील नवरी सुळक्यावर जिजाऊ जयंती साजरी केली. तसेच प्रजासत्ताक दिन हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या कळसुबाई या शिखरावर तिरंगा फडकावून व राष्ट्रगीत गाऊन साजरा केला. अशा विविध मोहिमा रोहित याने काम करत करत पूर्ण केल्या आहेत.
फोटो ओळ : कळकरायचा सुळका यशस्वीपणे चढाई करून तिरंगा फडकविताना गिर्यारोहक रोहित जाधव आणि त्यांचे सहकारी आशिष मगरे.