परिवहन वाहनांच्या ‘एक्सप्रेस’ वेगाला ‘ब्रेक’
By Admin | Updated: April 20, 2016 00:21 IST2016-04-19T23:23:44+5:302016-04-20T00:21:20+5:30
‘स्पीड गव्हर्नर’ बंधनकारक : पासिंग थांबवले; प्रवासी तसेच मालवाहू वाहनांना आता वेगमर्यादा

परिवहन वाहनांच्या ‘एक्सप्रेस’ वेगाला ‘ब्रेक’
कऱ्हाड : महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर वाहतुकीचा वेग वाढला; पण या वाढत्या वेगामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले़ इतर वाहनांपेक्षा परिवहनच्या वाहनांचा वेग प्रवाशांच्या काळजात धडकी भरवणारा असतो. मात्र, आता या वेगाला ‘ब्रेक’ लागला असून, परिवहन संवर्गातील वाहनांना ‘स्पीड गव्हर्नर’ बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यामुळे चालकाने कितीही ‘अॅक्सिलेटर’ दाबला तरी संबंधित वाहन निर्धारीत वेगापेक्षा जास्त वेगाने धावूच शकणार नाही.
स्टेअरिंगवर हात, अॅक्सीलेटवर पाय, डोळ्यावर गॉगल अन् बंद काचा़ ‘स्पिडॅमीटर’चा काटा क्षणाक्षणाला पुढे सरकतो़ १००़़़ ११०़़़ १२०़़़ तर कधी त्याही पुढे; पण जोपर्यंत अडथळा येत नाही, तोपर्यंत चालकाचा ‘अॅक्सिलेटर’वरचा पाय हटत नाही़ लक्ष कुठंही असलं तरी गाडीचा वेग मात्र वाढतच असतो़ बंद काचांमुळे वेगाची जाणीव होत नाही अन् ज्यावेळी जाणीव होते त्यावेळी वाहनावर चालकाचा ताबा राहत नाही़ चालकाचा ताबा सुटल्यानेच अनेक वाहने अपघातग्रस्त होतात. त्यामध्ये काही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर होतो. महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या वेगाची तपासणी करण्यासाठी महामार्ग पोलिसांना ‘स्पिडगन’ पुरविण्यात आल्या आहेत़ मात्र, त्या ‘स्पिडगन’चा क्वचितच वापर होतो़ वेगाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी कधीतरी एखाद्या चालकावर कारवाई होताना दिसते़ एरव्ही प्रत्येक सेकंदाला वाऱ्याच्या वेगात वाहने धावत असतात़
प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा हा अमर्याद वेग कधीकधी अनेकांच्या जीवावर बेततो. त्यामुळे या वाहनांच्या वेगाला मर्यादा घालण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत कागदोपत्री कार्यवाही सुरू होती. मात्र, तांत्रिक अडचणी व इतर कारणांमुळे वेग मर्यादेचा विषय रखडत गेला. अखेर शासनाने याबाबत अधिसूचना काढली असून, वाहनांची वेग मर्यादा निर्धारीत केली आहे. वाहनांच्या या निर्धारित वेगासाठी वाहनांना वेगनियंत्रक बसविणे बंधनकारक केले आहे. १ आॅक्टोबर २०१५ रोजी व त्यानंतर उत्पादित होणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेसच हे नियंत्रक बसविणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून ही अधिसूचना लागू करण्यात आली असून, प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतून वाहनांचे पासिंगही थांबविण्यात आले आहे. वेग नियंत्रक बसविल्यानंतरच वाहनांचे पासिंग होणार आहे. (प्रतिनिधी)
या वाहनांना वेग नियंत्रकातून वगळले
मालवाहू दुचाकी, क्वाड्रीसायकल, फायर टेंडर्स, रुग्णवाहिका, पोलिस वाहने या वाहनांना वेग नियंत्रकातून सूट देण्यात आली आहे. फायर टेंडर्स, रुग्णवाहिका व पोलिस वाहने आपत्तीच्या वेळी वेगाने धावतात. त्यांना त्यावेळी ते गरजेचे असल्यामुळे ही सूट देण्यात आली आहे.
...तर नूतनीकरणही नाही!
मालवाहू तसेच प्रवासी वाहनांचे ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करावे लागते. मात्र, यापुढे वेग नियंत्रक नसलेल्या वाहनांचे नूतनीकरण तसेच नोंदणी करण्यात येणार नाही. त्यामुळे परिवहन संवर्गात नोंदणी होणाऱ्या वाहनांना उत्पादकाने किंवा वाहन वितरकाने वेग नियंत्रक बसवूनच वाहने नोंदणी व योग्यता प्रमाणपत्रासाठी हजर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवासी वाहनांनाही आता नियंत्रक
मालवाहू वाहनांबरोबरच प्रवासी वाहनांनाही वेग नियंत्रक बंधनकारक करण्यात आले आहे. आॅटो रिक्षा, दुचाकी तसेच काळी-पिवळी जीप यांना त्यामधून वगळण्यात आले आहे. मात्र, ८+१ पेक्षा जास्त प्रवासी क्षमता असलेली वाहने, ट्रॅव्हल्स, मिनी ट्रॅव्हल्स यांना हे वेग नियंत्रक बसवावा लागणार आहे.