समर्थ सद्गुरू मच्छीमार संस्थेच्या वतीने मच्छीमारांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:32+5:302021-06-17T04:26:32+5:30
येथील समर्थ सद्गुरू मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याबरोबर त्यांना अत्याधुनिक पद्धतीने ...

समर्थ सद्गुरू मच्छीमार संस्थेच्या वतीने मच्छीमारांना प्रशिक्षण
येथील समर्थ सद्गुरू मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याबरोबर त्यांना अत्याधुनिक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी आवश्यक असणारी जाळी संस्थेच्या माध्यमातून दिली जातील तसेच शासकीय योजनांचा लाभही देण्यात येईल, असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष रमेश देवरे यांनी दिले.
उरमोडी धरणात पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या कातकरी समाजाच्या मच्छीमारांना तसेच उरमोडी धरणात मच्छीमारी करणाऱ्या बुडीत क्षेत्रातील लोकांना संस्थेच्या वतीने प्रशिक्षण आणि मदत मिळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत वारुंजीकर, निवृत्त मत्स्य व्यवसाय अधिकारी घाडगे, डॉ. कुडले यांनी मार्गदर्शन केले.
मत्स्य विकास अधिकारी वारुंजीकर म्हणाले, शासनाच्या वतीने मच्छीमारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेतला पाहिजे. शेततळ्याच्या माध्यमातून, खुल्या धरणातून तसेच बायोफ्लोक पद्धतीने मत्स्यपालन आणि मासेमारी करता येते. त्यासाठीच्या विविध योजनांचाही लाभ घ्यावा.
घाडगे म्हणाले, रंगीत मासेपालन आणि त्याच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. याची माहिती घेऊन मत्स्य व्यवसाय केला पाहिजे.
समर्थ सद्गुरू संस्थेचे अध्यक्ष रमेश देवरे यांनीही यावेळी संस्थेच्या माध्यमातून भागातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येतील तसेच आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी उरमोडी मातेची ओटीभरणही करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव रवींद्र वाईकर, शशी वाईकर, सुधीर देसाई, गजानन वाईकर, गणेश कदम, सुनील केंजळे, किरण वांगडे, मनोज देवरे, काशीनाथ शेलार यांच्यासह भागातील संस्थेचे सभासद व मच्छीमार उपस्थित होते.