भाजी मंडईत शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांची दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST2021-04-09T04:41:02+5:302021-04-09T04:41:02+5:30

मलकापूर : शहरात सुसज्ज भाजी मंडई सुरू झाल्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी सवता सुभा मांडत कोयना वसाहत येथे जखिणवाडी रस्त्यावरच मंडई ...

Traders bully farmers in vegetable market | भाजी मंडईत शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांची दादागिरी

भाजी मंडईत शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांची दादागिरी

मलकापूर : शहरात सुसज्ज भाजी मंडई सुरू झाल्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी सवता सुभा मांडत कोयना वसाहत येथे जखिणवाडी रस्त्यावरच मंडई थाटली. मंगळवारी काले येथील शेतकऱ्यांचा माल काही व्यापाऱ्यांनी दमदाटी करत रस्त्यावर फेकून दिला. यावरून या मंडईत ठराविक व्यापारी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, ही रस्त्यावरील वादग्रस्त मंडई बंद करण्याची मागणी काही रहिवाशांनीही प्रशासनाकडे पत्रकाद्वारे केली आहे. याचा विचार करून बुधवारी प्रशासनाने तत्काळ कारवाई केली. मंडई हटवत अधिकृत मंडईतच बसावे, अशा सूचना दिल्या.

मलकापूर पालिकेने अनेक वर्षांचा भाजी मंडईचा प्रश्न मिटवत राजमाता अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई सुरू केली. मात्र, काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांना पायदळी तुडवत कोयना वसाहत येथे जखिणवाडी रस्त्यावर मंडई भरवली. या मंडईत ग्रामीण भागातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी येतात. मात्र, व्यापारी त्यांना बसायला जागा देत नाहीत. मंगळवारी काले येथील दोन शेतकरी दोडका घेऊन कोयना वसाहतीत विक्रीसाठी गेल्यावर व्यापाऱ्यांनी दादागिरी करत त्यांना इथे बसायचे नाही, असे धमकावले. यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांच्यात बाचाबाची झाली. व्यापाऱ्यांनी दादागिरी करत शेतकऱ्यांकडील दोडका, वांगी व इतर माल रस्त्यावर फेकून दिला. हा प्रकार स्थानिक ग्राहकांसह रहिवाशांनी पाहिला. याप्रकरणी सायंकाळी संबंधित शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. अशा परिस्थितीत बुधवारी कोयना वसाहत प्रशासन, पोलिसांनीही वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने बसलेल्या विक्रेत्यांना तत्काळ हटवण्याची कार्यवाही सुरू केली.

पोलीस व कोयना वसाहत ग्रामपंंचायतीने केलेल्या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, ठराविक विक्रेते स्थानिक प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यापुढे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी रस्त्यावरील भाजी मंडईबाबत लक्ष घालून नियोजन करणार असून, त्याची तयारी सुरू केली आहे.

- चौकट

तहसीलदारांसह मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी

भाजी मंडईत सततच्या वादाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तहसीलदार अमरदीप वाकडे व मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी बुधवारी मलकापूर मंडईची पाहणी केली. यावेळी इतरत्र मनमानी करून रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

- कोट

जखिणवाडीकडे जाणारा हा रस्ता अरूंद आहे. या रस्त्यावर शालेय विद्यार्थी, नागरिक व वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावरच भरत असलेल्या मंडईने वरचेवर वाहतूक कोंडी होते. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र, शाळेतून ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम सुरू असते. मंडईतील गर्दी व गोंधळामुळे नेहमीच त्रास होतो. ही मंडई बंद करण्याबाबत अनेकवेळा तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नाही. काही हट्टी लोकांवर कडक कारवाई करूनही रस्त्यावरील गैरसोय टाळावी.

- विलासराव पाटील

सचिव, रोटरी शिक्षण संस्था

फोटो : ०८केआरडी०४

कॅप्शन : जखिणवाडी, ता. कºहाड येथे रस्त्यावरच भरत असलेल्या भाजी मंडईतील गर्दीने वाहतूक कोंडी होत असून कोरोनाचे सर्व नियमही धाब्यावर बसविले जात आहेत. (छाया : माणिक डोंगरे)

Web Title: Traders bully farmers in vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.