‘सह्याद्री’त आजपासून प्राणिगणना

By Admin | Updated: January 14, 2015 00:31 IST2015-01-13T23:22:32+5:302015-01-14T00:31:35+5:30

पर्यटकांना मज्जाव : विविध वन्यजीवांच्या अस्तित्वाचे पुरावे शोधणार; कॅमेऱ्यांचे फूटेजही तपासणार

From today on 'Sahyadri' | ‘सह्याद्री’त आजपासून प्राणिगणना

‘सह्याद्री’त आजपासून प्राणिगणना

सातारा : कोयना अभयारण्यातील (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प) वन्यजीवांच्या गणनेचे काम बुधवार दि. १४ पासून सुरू होणार आहे. दि. २२ जानेवारीपर्यंत हे काम चालणार असून, या कालावधीत अभयारण्याच्या क्षेत्रात पर्यटकांना जाता येणार नाही.
कोयना अभयारण्यातील बहुतांश भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट आहे. प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पर्यटकांना परवानगी आहे. विशेषत: वासोटा आणि कांदाटी खोऱ्यात अनेकदा पर्यटक जातात.
तथापि, वन्यप्राण्यांची गणना सुरू असेपर्यंत या क्षेत्रात पर्यटकांना मज्जाव करण्यात आला असून, आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असे वन्यजीव विभागाच्या बामणोली वनक्षेत्रपालांनी कळविले आहे.
गणनेच्या कालावधीत वन्यजीव विभागाचे प्रगणक या भागातील विविध वन्यजीवांच्या अस्तित्वाचे पुरावे जमा करतील, तसेच त्यांच्या संख्येचाही अंदाज घेतील. अभयारण्यात अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे लावण्यात आले आहेत.
प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा शोधण्याबरोबरच या कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्यात येईल. त्यावरून विविध वन्यजीवांची संख्या समजू शकेल. या गणनेत स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात येणार नाही.
कोयना परिसरात सध्या पट्टेरी वाघांसह, बिबटे, अस्वले, रानडुक्कर, भेकर, सांबर, रानकुत्री, गेळा (पिसोरी), माळसडा (चौशिंगा), गवे, कोल्हे, भेकर, तरस, साळिंदर, शेकरू आदी सस्तन प्राणी आढळतात. यांची
गणणा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

अशी केली जाते मोजदाद...
अभयारण्याच्या क्षेत्रात वन्यजीवांचे अधिवास असणाऱ्या ठिकाणी दोन किलोमीटर लांबीची रेषा आखण्यात येते. तिला ‘ट्रान्सेक्ट लाइन’ असे म्हणतात.
या रेषेवर चारशे, आठशे, बाराशे आणि सोळाशे मीटर अंतरावर खुणा केलेल्या असतात. याचाच अर्थ चारशे मीटरचे पाच भाग केलेले असतात.
या खुणांपासून दोन मीटर ते वीस मीटर आकाराची वर्तुळे आखली जातात. ‘ट्रान्सेक्ट लाइन’जवळून सकाळी चालत जाऊन प्रगणक संध्याकाळी परत येतात.
आखलेल्या वर्तुळांमध्ये वन्यजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा शोधल्या जातात. यात विविध प्राण्यांची विष्ठा आणि अन्य पुराव्यांचा समावेश असतो.
‘ट्रान्सेक्ट लाइन’जवळून जाताना आणि येताना आढळलेल्या पुराव्यांवरून, वन्यजीवांच्या सवयी लक्षात घेऊन त्यांच्या संख्येचा अंदाज बांधला जातो.

Web Title: From today on 'Sahyadri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.