जागतिक पुस्तक दिन: ३५ दालनं अन् ४० हजार पुस्तकं; साताऱ्यानं महाराष्ट्राला दिलं ‘पुस्तकांचं गाव’!
By सचिन काकडे | Updated: April 23, 2025 15:38 IST2025-04-23T15:38:09+5:302025-04-23T15:38:31+5:30
राज्य मराठी विकास संस्थेचा प्रत्येक जिल्ह्यात साकारणार उपक्रम

जागतिक पुस्तक दिन: ३५ दालनं अन् ४० हजार पुस्तकं; साताऱ्यानं महाराष्ट्राला दिलं ‘पुस्तकांचं गाव’!
सचिन काकडे
सातारा : वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी राज्यशासनाने महाबळेश्वर तालुक्यातील ‘भिलार’ या गावात ‘पुस्तकांचं गाव’ ही अभिनव संकल्पना राबविली. असाच प्रयोग राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या माध्यमातून वाचनप्रेमींना साहित्य कलाकृतींचा आनंद एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा, यादृष्टीने तत्कालीन सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून ‘पुस्तकांचं गाव’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमासाठी महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची निवड करण्यात आली. गावातील घरे, मंदिरे तसेच हॉटेलमध्ये पुस्तकांची स्वतंत्र दालने सुरू करून येथे बालसाहित्य, कथा, कादंबरी, कविता, मराठी भाषा व संस्कृती, नियतकालिके, कथा, लोकसाहित्य आदी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करण्यात आली.
यानंतर ४ मे २०१७ साली भिलार हे गाव देशातील पहिलं ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून घोषित करण्यात आलं. स्थानिक नागरिकांसह महाबळेश्वर, पाचगणीला येणारे लाखो पर्यटक या गावाला भेट देऊन येथील साहित्यकृतींचा आनंद घेऊन वाचन संस्कृती जोपासण्याचे काम करत आहेत. हा उपक्रम आता एक-दाेन जिल्ह्यांपुरता मर्यादित न ठेवता व्यापक स्वरूपात राबविला जाणार आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून ‘पुस्तकांचं गाव’ साकारलं जाणार आहे.
३५ दालनं अन् ४० हजार पुस्तकं
भिलारमध्ये पुस्तकांच्या दालनांची संख्या हळूहळू वाढत आहे. आजमितीला ३५ दालनांमध्ये विविध साहित्यकृतींची तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ४० हजारांहून अधिक पुस्तकांची मेजवानी वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे.
दोन युवती बनल्या फौजदार..
भिलार गावात स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे दालनही सुरू करण्यात आले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दोन तरुणींनी येथे अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. या दोन्ही तरुणी मुंबई पोलिस दलात भरती झाल्या आहेत.
राज्य शासनाने भिलारच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘पुस्तकांचं गाव’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी, ती मनामनांत रुजावी, हा या मागचा उद्देश आहे. - डॉ. श्यामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था