जागोजागी लहानग्यांना गिळू पाहतोय काळ
By Admin | Updated: May 1, 2015 00:17 IST2015-04-30T23:22:00+5:302015-05-01T00:17:02+5:30
जरा जपून, पुढे धोका आहे... : मुलांना धोक्याची जाणीव करून देणे पालकांची जबाबदारी

जागोजागी लहानग्यांना गिळू पाहतोय काळ
प्रदिप यादव - सातारा तालुक्यातील शेंद्रे गावाजवळ टाकीत बुडून दोन मुलांचा करुण अंत झाला तरी धोकादायक टाक्या, चेंबर, डीपी असे अनेक धोके खुलेच ठेवल्याचे दिसून येत आहे. आई-वडिलांचेही मुलांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून मुलांभोवती धोके नव्हे तर धोक्याभोवती मुले घोटाळताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात शेंद्रे येथे परप्रांतीय मजूर कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा उघड्यावर असणाऱ्या शौचालयाच्या टाकीत पडून अंत झाला. त्याच आठवड्यात मेढा येथेही अशीच दुर्घटना घडली होती. आपल्या घराबाहेर आजूबाजूला अशी काही ठिकाणं असतात की जी लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात. सातारा शहरातही अशी अनेक धोक्याची ठिकाणं आहेत, जिथं लहान मुलं खेळण्याच्या निमित्तानं जातात. आपल्या लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवायलाच हवे. कारण घराबाहेर दडून बसलेला काळ कधी येईल, याचा काही नेम नाही.
उन्हाळ्याची शाळेला सुटी लागल्यामुळे आणि घरात उकाडा असल्यामुळे लहान मुलं घराबाहेरच खेळत असतात. अंगणातल्या झाडांवर फळं काढण्यासाठी चढणे, उघड्या टाक्यांशेजारी क्रिकेट खेळणे, आई-बाबांचा डोळा चुकवून पाण्याच्या ठिकाणी जाणे, पाण्यात दगड मारत बसणे असे नानाप्रकारचे खेळ लहान मुले खेळत असतात. अशावेळी घरात बसून न राहता आई-वडिलांनी आपल्या मुलांना सांगितले पाहिजे की, बाळांनो, जरा जपून... पुढे धोका आहे! तसेच कामानिमित्त काढलेल्या पाण्याच्या टाक्यांवर मजबूत झाकण ठेवणेही गरजेचे आहे.
भुयारी गटारांचे चेंबर उघडेच!
शहरातील सांडपाणी वाहून जावे, यासाठी नगरपालिकेने भुयारी गटारे बांधली आहेत. शहराचा भौगोलिक भाग हा चढ-उताराचा असल्यामुळे भुयारी गटारांची खोली चार ते पाच फूट ठेवण्यात आलेली आहे. ही गटारे साफ करणे, सोयीचे व्हावे, यासाठी ठिकठिकाणी चेंबर काढली आहेत. यामुळे घरातील घाण पाणी बाहेर काढण्याचे काम तर झाले. मात्र, शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटारांची चेंबर्स उघडी असल्याचे पाहावयास मिळते. लहान मुले उत्सुकतेपोटी तिथे जातात आणि आत डोकावून पाहतात. तसेच क्रिकेट खेळताना चेंडू गटारात गेल्यास तो काढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी दुर्घटना घडू शकते. उघडे चेंबर अपघाताला निमंत्रण देत आहेत.
सार्वजनिक शौचालयांच्या टाक्या झाकणाविना
शहरातील अनेक सार्वजनिक शौचालयांच्या टाक्यांना झाकण नाही. या टाक्यांवरील सिमेंटच्या झाकणातील लोखंड चोरण्यासाठी अनेक ठिकाणची झाकणे चोरट्यांनी फोडली आहेत. त्यामुळे अशा उघड्या टाक्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. घराजवळ असणाऱ्या अशा टाक्यांभोवती लहान मुले खेळत असतात. टाक्यांभोवती वाढलेल्या गवत, झुडपांमुळे अंदाज न आल्याने दुर्घटना घडू शकते. चेंडू टाकीत पडला तर मुलं धोका पत्करून तो काढण्याचा प्रयत्न करतात.
फळं काढताना तोल गेला तर...
सध्या आंबा, चिंच, पेरू, चिक्कू या फळांचा हंगाम सुरू झाला आहे. आपल्या घराची शोभा वाढावी, घरच्या झाडांची फळे खायला मिळावी, यासाठी अनेक घरांसमोर आंबा, पेरू, चिकूची झाडे लावलेली दिसतात. फळांनी लगडलेल्या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी कंपाउंड घातलेले असते. ते कधी तारेचे असते किंवा विटांची भिंतही उभारलेली असते. लहान मुले फळे काढण्यासाठी घरातील लोकांचा डोळा चुकवून कंपाउंडवर चढतात. हाताला फळ लागत नसले तर टाचा उंचावून एक फांदी हाताने वाकवून फळे काढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तोल जाऊन पडण्याची भीती असते. काही वेळेला घराच्या पत्र्यावर चढून किंवा इमारतीच्या टेरेसवर जाऊन फांद्या ओढून फळे काढण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळी चुकून तोल गेला तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दिवसभर मुलं कुठेतरी खेळतायत असा समज करून पालक घरात निर्धास्त असताना जर एखादा अपघात घडला तर पश्चातापाशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.
लोकवस्तीजवळील उघडे डीपी बॉक्स
लोकवस्तीजवळ असणाऱ्या वीजवितरणच्या डीपी बॉक्सला दरवाजा नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. डीपीची झाकणे चोरीला जात असल्यामुळे उघडे डीपी धोकादायक बनले आहेत. जमिनीपासून तीन चार फुटांवर उघड्या अवस्थेत असणाऱ्या डीपीजवळ मुले गेल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच डीपी बॉक्स उंच ठिकाणी ठेवून ते कुलूप बंद करणे गरजेचे आहे.