शेतकऱ्यांच्या डोक्यावर लटकतोय काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST2021-06-21T04:25:01+5:302021-06-21T04:25:01+5:30
तळमावले : खळे (ता. पाटण) येथील शिवारामध्ये ऊसाच्या शेतात उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. वाहिन्यांचा ताण ...

शेतकऱ्यांच्या डोक्यावर लटकतोय काळ
तळमावले : खळे (ता. पाटण) येथील शिवारामध्ये ऊसाच्या शेतात उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. वाहिन्यांचा ताण काढण्यात आला नसल्याने या वाहिन्या लोंबकळत असून, शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागत आहे.
खळे येथे वांग नदीकाठावर असलेल्या घाणपट्टी शिवारात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. सध्या या शेतीमध्ये ऊसासह अन्य पिके घेण्यात आली आहेत. याच शिवारातून उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. शिवारातील जयसिंग खाशाबा कचरे यांच्या ऊसाच्या शेतामधून या उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या असून, सध्या या वाहिन्यांचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे वाहिन्या अक्षरश: ऊसाला टेकल्या आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या विभागात यापूर्वी विद्युत वाहिन्या तुटून शेतात पडल्याच्या आणि त्याचा स्पर्श झाल्यामुळे शेतकरी तसेच जनावरे ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खळे येथील या धोकादायक विद्युत वाहिन्यांना ताण देऊन त्या उंचावर घ्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
- कोट
आमच्या ऊसाच्या शेतामध्ये उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या असून, सध्या त्यांचा ताण कमी झाल्यामुळे त्या हाताच्या अंतरावर लोंबकळत आहेत. त्या आणखी थोड्या खाली आल्या तर हाताला लागतील. त्यामुळे धोका पत्करून शेतात काम करावे लागत आहे.
- सचिन कचरे
शेतकरी, खळे